नांदेड :
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविषयीची माहिती, अनुभव आणि सकारात्मक दृष्टिकोन मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला राज्यस्तरीय सन्मान मिळाला आहे. नांदेडचे साहित्यिक, कवी, गझलकार व अनुवादक जयराम नारायण धोंगडे यांनी अनुवादित केलेल्या ‘झुंज कॅन्सरशी’ या पुस्तकाची ‘अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२५’ साठी निवड झाली आहे.
ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. सचिन मर्दा यांच्या I Am Unstoppable या इंग्रजी पुस्तकाचा धोंगडे यांनी ‘झुंज कॅन्सरशी’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपयुक्त ठरेल, तसेच या आजाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळेल, या उद्देशाने त्यांनी हा अनुवाद मराठी वाचकांच्या हितार्थ केला.
वैद्यकीय विषयातील आशय सर्वसामान्य मराठी वाचकांना सहज समजेल अशा सुबोध आणि प्रवाही भाषेत उपलब्ध करून देण्याचा धोंगडे यांचा हा प्रयत्न आहे. मूळ लेखकाच्या अनुभवविश्वाचा आणि पुस्तकातील आशयाचा प्रामाणिकपणे मराठीत अनुवाद करताना वाचनीयता आणि संवेदनशीलता जपल्याबद्दल त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
अक्षरमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्या वतीने देण्यात येणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, राजवाडा चौपाटी, सातारा येथील सोमण सभागृहात होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
जयराम धोंगडे हे कविता, गझल, साहित्य आणि अनुवाद या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्यिक प्रवासात ‘झुंज कॅन्सरशी’ या अनुवादाला मिळालेला हा सन्मान विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. साहित्य केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता ते समाजाच्या उपयोगी पडावे, या भूमिकेतून केलेल्या त्यांच्या अनुवादकार्याला मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती आहे.
