You are currently viewing जागतिक सुलेखन दिनानिमित्त…
Oplus_16908288

जागतिक सुलेखन दिनानिमित्त…

 

विटे / सांगली (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

आज 12 ऑगस्ट. जागतिक सुलेखन दिन. अक्षरांना एक देखणे, लयबद्ध आणि कलात्मक रूप देणाऱ्या या अप्रतिम कलेचा गौरव व्हावा हा उद्देश या दिना मागे आहे. सुलेखन या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ‘कॅलोस’ (सुंदर) आणि ‘ग्राफिन’ (लिखाण) यांपासून झाली आहे.

सुंदर हस्ताक्षरे ही एक कला आहे, जी प्रत्येकाला प्रयत्नानंतर हमखास अवगत करता येते. आपण एखादं चित्र काढतो, त्याला कलात्मक पद्धतीनं सजवतो, विविध रंगांचा साज चढवतो. अगदी असंच अक्षरांचं देखील आहे, यालाच आपण ‘सुलेखन’ म्हणतो.

सुलेखनाचा मुख्य उद्देश नेत्र-सुखदता आहे. चांगले अक्षर पहात बसावे असे असते. त्या अक्षरातलं कलात्मक सौंदर्य पाहिल्यानंतर डोळ्याची पारणे फिटल्याची अनुभूती येते. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं लिहिणं आणि आपली अक्षरे सुद्धा सुंदर हवीत. सुंदर जीवनासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्यासाठी आपल्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती हवी. पूर्वी बोरू, टाक, विशिष्ठ निब यांनी लिहलेली अक्षरे कोरल्यासारखी असत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक आले आणि आपली लिखाणाची आवडच संपली. असे म्हणतात की माणसाचा स्वभाव त्याच्या हस्ताक्षरावरून समजतो. या संगणकीय दुनियेमध्येदेखील प्रत्येकाने आपली हस्ताक्षरे जिवंत ठेवावीत, यासाठीच जागतिक हस्ताक्षर दिनाचे प्रयोजन असावे, असे वाटते.आपले लिखाण शुद्ध, स्पष्ट, स्वच्छ आणि एकसारखे असणे म्हणजेच सुंदर अक्षरे होय.

खरेतर माणसाची प्रत्येक गोष्ट सुंदर असायला हवी. ज्या प्रमाणे आपली वेशभूषा, आपली देहबोली या बाह्यगोष्टींवरून आपले व्यक्तिमत्व खुलून दिसते, त्याप्रमाणे हस्ताक्षराच्या माध्यमातून आपले अंतरंग आणि बाह्यरंग आणखी सुंदर करण्याची जणू एक संधीच उपलब्ध होऊन जाते.हस्ताक्षरामुळे स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यास मदत होऊ शकते.

आपण आपली नाती जपतो, त्याप्रमाणे आपले सुलेखन जपू या. वळणदार अक्षर ही एक कलाच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा