विटे (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : आसाम राज्यात आलेल्या भीषण महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विटा येथील ‘नेचर केअर फर्टीलायझर्स प्रा. लि.’ आणि ‘बरवा स्किन थेरपी’ यांनी सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून ₹२,००,००० (दोन लाख रुपये) रुपयांचा मदतनिधी देऊन आपला खारीचा वाटा उचलला आहे.
यंदा आसाम राज्यात महापुराने भीषण थैमान घातले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने हजारो नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे, तर सखल भागातील शेती अन् सुपीक जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दोन्ही संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपले एक दिवसाचे वेतन दिले. या रकमेत बर्वे कुटुंबीयांनी उर्वरित योगदान देऊन २ लाख रुपयांचा निधी उभारला.
आज हा दोन लाख रुपयांचा धनादेश मा. प्रांताधिकारी श्री. विक्रमसिंह बांदल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आपत्तीच्या काळात व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे हे प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे, या भावनेतून हे कार्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सामाजिक औदार्याबद्दल प्रांताधिकारी श्री. विक्रमसिंह बांदल यांनी नेचर केअर फर्टीलायझर्स, बरवा स्किन थेरपीचे व्यवस्थापन, बर्वे कुटुंब आणि सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले नेचर केअर व बरवा स्किन थेरपी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.. मागील वर्षी देखील मराठवाड्यातील पूरस्थितीत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मदत केली होती.
यावेळी कंपनीचे चेअरमन श्री. जयंत बर्वे, अमृत कुलकर्णी, अनिरुद्ध बर्वे, राजीव चाफेकर, प्रकाश जाधव, प्रकाश कुरकुटे, प्रथमेश देसाई आदी उपस्थित होते.
