सांगली :
भक्ती प्रकाशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नगर वाचनालय, सांगली येथे ‘पहिले अक्षरलेणी साहित्य संमेलन, सांगली २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पिंपरी) असणार आहेत.
साहित्य, कविता, गझल, पुस्तक प्रकाशन आणि साहित्यिक संवाद अशा विविध कार्यक्रमांनी सजलेले हे संमेलन साहित्य प्रेमींसाठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती आयोजक भास्कर पाटील व सौ. मनिषा रायजादे यांनी दिली.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. संजय ठिगळे (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, सांगली) तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा. दि. बा. पाटील उपस्थित राहणार आहेत. असून ज्येष्ठ साहित्यिक व देशिंगचे मा. दयासागर बने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात मा. प्रा. महादेव रोकडे (लेखक व पत्रकार, पुणे) आणि मा. ॲड. कृष्णा पाटील (प्रसिद्ध कथाकार, तासगाव) यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. सूत्रसंचालनाची धुरा श्रीकांत माने (कुंडल) आणि सारिका पाटील (कोल्हापूर) सांभाळणार आहेत.
संमेलनातील विशेष आकर्षण म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष कवडे (मिळवडी) यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली असून ती प्रसिद्ध कवयित्री मनीषा पाटील हरोलीकर घेणार आहेत. त्यांच्या साहित्य प्रवासातील विविध पैलूंवर यावेळी संवाद साधला जाणार आहे.
यानंतर खुले कवीसंमेलन व गझल संमेलन रंगणार आहे. या कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयित्री माधुरी चौधरी (छत्रपती संभाजीनगर) राहणार असून प्रा. संतोष काळे (पलूस) आणि डॉ. स्वाती पाटील (सांगली) हे सूत्रसंचालन करणार आहेत. राज्यभरातील कवी, गझलकार आणि साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असल्याने दर्जेदार साहित्यिक मेजवानी अनुभवण्याची संधी साहित्यरसिकांना मिळणार आहे.
या संमेलनाचे आयोजन भक्ती प्रकाशन, मिरज यांनी केले असून प्रकाशक भास्कर पाटील तसेच सहयोगी प्रकाशिका मनीषा रायजादे-पाटील यांनी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार
विटे, जि. सांगली
भ्रमणध्वनी 9881157709
