You are currently viewing आचरा ग्रामपंचायतीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम
Oplus_16908288

आचरा ग्रामपंचायतीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम

आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न; अनुराधा नारकर यांचे प्रतिपादन

मालवण / आचरा : निरोगी व सुदृढ बालक निर्माण होण्यासाठी आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम अन्न असून ते अमृततुल्य असल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी केले.

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आचरा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात अनुराधा नारकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, प्रकल्प अधिकारी मालवण उल्का खोत उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्या पूर्वा तारी, सायली सारंग यांच्यासह आचरे गावातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी प्रकल्प अधिकारी उल्का खोत यांनी स्तनपान सप्ताहाचे महत्त्व पटवून देताना मातांना स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगितले. बाळाला जन्मानंतर तासाभरात स्तनपान सुरू करणे किती महत्त्वाचे आहे, तसेच पहिल्या सहा महिन्यांत आईचे दूध बाळाला पाजणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात मान्यवरांनी बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांनीही कार्यक्रमास भेट देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमानिमित्त पोषण आहार आणि रंगोळी प्रदर्शनातून योग्य आहाराबाबत जनजागृती करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा