You are currently viewing ‘माझी वसुंधरा’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ८ ऑगस्टला सावंतवाडीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा

‘माझी वसुंधरा’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ८ ऑगस्टला सावंतवाडीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा

३, ६ आणि १२ तासांच्या गटांत होणार स्पर्धा; महाराष्ट्र, गोवा व अन्य राज्यांतील शेकडो धावपटूंचा सहभाग

सावंतवाडी : नगरपरिषद व ‘सिंधू रनर्स, सावंतवाडी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही अनोखी स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी रात्री ८.०० वाजता ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत ऐतिहासिक मोती तलाव परिसरात पार पडणार आहे. या स्पर्धेचा भव्य शुभारंभ ८ ऑगस्ट रोजी रात्री ८.०० वाजता राजवाडा प्रवेशद्वार येथून होणार आहे.

या मॅरेथॉनमध्ये ३ तास, ६ तास आणि १२ तास अशा तीन मुख्य गटांचा समावेश असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा आणि इतर राज्यांतील शेकडो नामांकित धावपटू यात सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होत असलेली फिटनेस संस्कृती, अल्ट्रा रनिंगबद्दल वाढलेला विश्वास आणि सिंधू रनर्सच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही स्पर्धा एक मोठी साक्ष ठरत आहे. आज ‘सावंतवाडी १२ तास रन’ ही महाराष्ट्रातील अल्ट्रा धावपटूंसाठी एक अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे.

सिंधू रनर्सने गेल्या काही वर्षांत सावंतवाडी १२ तास रन, शिवज्योत रन, गोवा-सावंतवाडी १०० कि.मी. इंटरसिटी रन तसेच सिंधू यंग चॅम्पियन्स किड्स रन यांसारखे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवून सिंधुदुर्गात धावण्याची चळवळ अधिक बळकट केली आहे. या उपक्रमांतून प्रेरणा घेऊन अनेक स्थानिक धावपटूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत सिंधुदुर्गचे नाव उज्ज्वल केले आहे.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश केवळ विजेते घडवणे एवढाच नसून, धावणे ही दैनंदिन आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग बनवणे, तरुणांमध्ये फिटनेसची जागृती निर्माण करणे, शुद्ध हवेसाठी पर्यावरणाचा समतोल राखणे, अल्ट्रा रनिंगला चालना देणे आणि सिंधुदुर्गमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू तयार करणे हा आहे. ‘सावंतवाडी १२ तास रन’ हा आज केवळ क्रीडा उपक्रम न राहता सिंधुदुर्गच्या जिद्दीचा आणि सामाजिक सहभागाचा प्रेरणादायी उत्सव बनला आहे.

रात्रभर चालणाऱ्या या अनोख्या क्रीडा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले आणि ‘सिंधू रनर्स’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा