मृत्यूचा सापळा’ ठरतोय चंदगड–दोडामार्ग–गोवा मार्ग
कोंबडी वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनांवर कारवाई करा; मनसेचे दोडामार्ग पोलिसांना निवेदन
सोनावल येथील युवकाच्या मृत्यूनंतर संताप; चालकांची तपासणी, वेगावर नियंत्रण आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
दोडामार्ग
चंदगड–दोडामार्ग–गोवा मार्गावर कोंबडी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या वाहनांच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोडामार्ग पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.
मनसेने दिलेल्या निवेदनात या मार्गावर धावणाऱ्या अनेक कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक नशेत किंवा झोपेच्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही वाहनांमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची शक्यता व्यक्त करत अशा वाहनांची सखोल तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शनिवारी सोनावल येथील एका युवकाचा कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवावे, त्यांच्या वेगावर नियंत्रण आणावे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी मनसेचे माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताराम गावकर यांच्यासह मुकुंद परब, अक्षय कुबल, संदेश सावंत, नवलू झोरे, नितीन देसाई, रत्नदीप गवस, अनुराग रेडकर, नाना देसाई, अर्जुन धुरी आदी मनसैनिक उपस्थित होते.
