You are currently viewing राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी मंत्री नितेश राणे यांची जेएनपीए बंदराला भेट

राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी मंत्री नितेश राणे यांची जेएनपीए बंदराला भेट

*बंदराच्या विस्तार आराखड्यासह विविध विकासकामांचा घेतला आढावा; वाढवण बंदर प्रकल्पासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा*

मुंबई :

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास साधण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे यांनी आज उरण येथील जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाच्या (JNPA) मुख्य प्रशासकीय भवनाला भेट देऊन बंदराच्या विविध विकासकामांचा तसेच भविष्यातील विस्तार आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष श्री.गौरव दयाळ, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप, जेएनपीएच्या सचिव तथा महाव्यवस्थापक श्रीमती मनीषा जाधव तसेच जेएनपीए आणि महाराष्ट्र सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जेएनपीएची विद्यमान बंदर क्षमता, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, आधुनिक पायाभूत सुविधा, कंटेनर हाताळणी क्षमता वाढ, तसेच पर्यावरणपूरक व्यवस्थापनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची मंत्री श्री.नितेश राणे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच, जेएनपीएमार्फत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली.

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून पालघर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचाही मंत्री श्री.राणे यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. राज्यातील बंदरांची क्षमता वाढविणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे, मल्टीमोडल लॉजिस्टिक नेटवर्क अधिक सक्षम करणे आणि महाराष्ट्राला जागतिक सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी मंत्री श्री.नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या सागरी विकासाला अधिक गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून विविध विकास प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यावर भर देत, बंदर क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा