जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबीर उत्साहात संपन्न…..
स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याचा मानस… सन्मा. उदयराव भोसले
कबड्डी पंच शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद… सन्मा. सुरेश गवस
सावंतवाडी
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्ताने सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने सावंतवाडी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय पंच शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेशराव गवस, तालुकाध्यक्ष उदयराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत सर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, जिल्हा सदस्य गुरुदत्त कामत, डॉ. तुषार भोसले, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे पदाधिकारी संजय पेडणेकर, दिनेश चव्हाण, नितीन हडकर, राष्ट्रीय पंच किशोर पाताडे, जयेश परब, पंचमंडळ सदस्य हेमंत गावडे, वैभव कोंडस्कर, संयोजन समिती सदस्य अजय जाधव, राजू बंगे, कृष्णा सावंत ,राज्य पंच प्रथमेश सावंत, रेनॉल्ड बुतेलो आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्याभरातून ३५ शिबिरार्थी शिबिरासाठी उपस्थित होते.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेमध्ये शिबिराचा हेतू विशद करताना दिनेश चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीच्या खेळाला क्रिकेटनंतर मोठी प्रसिद्धी मिळत आहे. कबड्डी खेळ चुरशीचा, गतिमान आणि उत्कंठावर्धक झाला तरच त्या खेळाला चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात मिळेल याकरिता ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनने प्रो कबड्डीच्या माध्यमातून खेळाच्या नियमांमध्ये नवनवीन बदल स्वीकारले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरापासून गावपातळीपर्यंत कबड्डी खेळाच्या नियमांमध्ये एकसूत्रता यावी याकरिता प्रचलित नियमांना व सिग्नलिंगना आधारभूत ठेवून काही सुधारित बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नियमांची ओळख व सिग्नल व व्हीसलिंगचा सराव व्हावा, तसेच जिल्ह्यातील नवोदित पंच जिल्हा व राज्यस्तरीय पंच परीक्षांसाठी सक्षम व्हावेत, यासाठी या पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले .स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची प्रतिष्ठा वाढविणे, खेळाडूंना मानसन्मान मिळवून देणे, शिक्षण व नोकऱ्यांमध्ये विशेष आरक्षण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भरीव मानधन, विविध स्पर्धांच्या बक्षीस रकमांमध्ये वाढ असे खेळाडू हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते. त्यांचे कबड्डीच्या कार्यकर्त्यांबरोबर थेट जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्राच्या कबड्डी विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील असे दिनेश चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदयराव भोसले यांनी स्वर्गीय दादांच्या कार्याचे विविध पैलू उलगडताना सांगितले की, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांवर, रोजगार, शेती, उद्योगधंदे, क्रीडा व शिक्षण अशा अनेक विषयांवरील त्यांचा अभ्यास दांडगा होता. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा ध्यास होता आणि त्यासाठी ते स्वतःला झोकून देत असत. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कबड्डी खेळासोबतच महाराष्ट्रातील मैदानी खेळांनाही त्यांनी राजाश्रय निर्माण करून दिला होता. आम्ही जेव्हा-जेव्हा दादांना भेटायला जायचो, तेव्हा ते प्रथम क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वेळ द्यायचे आणि त्यानंतर आमच्या बैठका व्हायच्या. त्यामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचे व्हिजन किती व्यापक होते, हे दिसून येते. स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त भव्य-दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे संजय पेडणेकर यांनी स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना २०११ मध्ये झालेल्या चौथ्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेची आठवण करून दिली. त्या स्पर्धेदरम्यान आचारसंहिता लागू झाल्यामुळे एवढ्या मोठ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची तयारी करता येत नव्हती. काय करावे हे समजत नसताना आम्ही दादांना फोन करून आमची व्यथा सांगितली. त्यावेळी दादांनी, “मी तुमच्या पाठीशी आहे. कामाला लागा, आचारसंहितेचे मी पाहतो,” असे सांगितले. त्यानंतर आम्ही जोमाने आणि उत्साहाने कामाला लागलो. अवघ्या दोन दिवसांत क्रीडा नगरी उभी केली.
दादांच्या आशीर्वादाने आणि माजी राज्यमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला येथे न भूतो न भविष्यती अशी दिमाखदार राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा पार पडली. दीपकभाईंच्या संकल्पनेतून नवाबाग बीचवर पोहोचण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झुलता पूल उभारण्यात आला होता. या स्पर्धेस अजितदादा, त्यांचे शिष्टमंडळ व अनेक मंत्र्यांची उपस्थिती लाभली होती.
स्पर्धेची भव्यता, झुलता पूल, खेळाडूंची उत्कृष्ट निवास व भोजन व्यवस्था, निसर्गरम्य समुद्रकिनारा अशा अनेक बाबी पाहून दादा अत्यंत आनंदित झाले होते. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती, ती आम्ही कधीच विसरू शकत नाही. तसेच या स्पर्धेबाबत त्यांनी वार्षिक अहवालात स्वतंत्रपणे अभिनंदन व कौतुक केले होते, असे संजय पेडणेकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेशराव गवस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आदरणीय शरद पवार यांच्याबरोबरच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजपर्यंत निस्वार्थीपणे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. स्वर्गीय अजितदादांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर फार मोठे दुःख कोसळले आहे.
श्रीमती सुनेत्राताईंना आपले दुःख सावरून दादांचे कार्य पुढे चालू ठेवायचे आहे, पक्षाची धुरा सांभाळायची आहे आणि उभ्या महाराष्ट्रात दादांनी जोडलेल्या असंख्य राजकीय, सामाजिक व क्रीडा कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहावे लागणार आहे. हीच खरी दादांना आदरांजली ठरेल.
या जिल्हास्तरीय पंच शिबिराचे उत्कृष्ट आयोजन, जिल्ह्याभरातून आलेल्या पंचांची उपस्थिती आणि त्यांच्याशी साधलेला संवाद पाहून मला आनंद झाला आहे. शिबिराच्या आयोजनासाठी आपण सर्वांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. यापूर्वीही आम्ही क्रीडा क्षेत्राला पाठबळ दिले आहे आणि यापुढेही देत राहू, असे आश्वासन श्री सुरेशराव गवस यांनी दिले.
याप्रसंगी राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले पंच श्री जयेश परब व श्री किशोर पाताडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमंत गावडे यांनी केले. शिबिरासाठी उपस्थित सर्व पंचांना जिल्हा पंचमंडळाच्या वतीने शिबिर कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे दिवसभरात आवश्यक कबड्डी नियमांवर व सिग्नलिंग, व्हिसलिंग व प्रात्यक्षिकांवर मार्गदर्शन करण्यात आले.
