You are currently viewing श्री तुकाराम मुंढे महाविद्यालयीन वाटचाल 

श्री तुकाराम मुंढे महाविद्यालयीन वाटचाल 

 

आज सर्वत्र गाजत असलेले सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे यांची गोष्ट खरंच आगळीवेगळी आहे. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये माणूस सनदी अधिकारी होऊ शकतो याच्या कोणावर विश्वासही बसणार नाही. शेतीवर मजुरासारखे काम करणे. अंगावर पुरेसे कपडे नसणे .जेवणाखावणाची नीट व्यवस्था नसणे. जाण्या येण्यासाठी वाहन नसणे .या सर्व गोष्टीवर मात करून श्री तुकाराम मुंढे आज हे महाराष्ट्रात यशाच्या शिखरावर विराजमान झालेले आहेत.

श्री तुकाराम मुंढे यांचा आदर्श जर आजच्या युवकांनी ठेवला तर निश्चितच ते पुढे जाऊ शकतात. त्यासाठी गरज आहे ती चिकाटीची सातत्याची आणि कठीण परिश्रमाची. हे सगळे वार श्री तुकाराम यांनी झेलले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या अंगी शिस्तप्रियता कर्तव्य दक्षता व न्यायप्रियता रुजली आहे. आपण जी गरिबी भोगली ती इतरांच्या वाटेला येऊ नये. येणारी पिढी सशक्त घडावी यासाठी ते ज्या विभागात जातात त्या विभागांमध्ये मैलाचे दगड होऊन जातात त्यामुळे आज सर्वत्र महाराष्ट्रात त्यांचा बोलबाला आहे.

दहावीला असताना छत्रपती संभाजी नगर येथे श्री तुकाराम मुंढे आपले बंधू श्री अशोकराव मुंढे यांच्याबरोबर एका लहान खोलीत राहायचे. त्या खोलीत अजून दोन जण राहायचे .पुढे श्री अशोकरावांनी लग्न केले आणि त्या खोलीत राहणाऱ्यांची संख्या पाच झाली. एकाच खोलीत पाच पाच लोक राहून प्रसंगी उपासमार करून तुकारामांनी आपले शिक्षण चालूच ठेवले.

अशोकराव व तुकाराम संभाजीनगर ला आल्यामुळे वडील श्री हरिभाऊ मुंढे यांची पंचाईत झाली. हे दोघेही भाऊ शेतात राबायचे. त्यामुळे वडिलांना मजूर लावण्याची गरज भासत नव्हती. पण वडील बंधू श्री अशोकराव यांनी टोकाची भूमिका घेतली. आम्ही शिकलो नाहीत तर आमचा विकास होऊ शकणार नाही.त्यासाठी आम्ही संभाजीनगरला जाणे गरजेचे आहे .हा निर्णय त्यांनी घेतला. अर्थातच तो वडिलांना पटला नाही. वडिलांचे म्हणणे होते की किमान तुकारामला तरी माझ्या मदतीसाठी ठेव. पण तुकाराम इथे राहिला तर तो फारसी प्रगती करू शकणार नाही .माझ्याबरोबर राहिला तरच स्पर्धा परीक्षेची नीट तयारी करू शकेल असं अशोकरावांना वाटत होते. त्यामुळे आज्ञाधारक असलेले अशोकराव प्रसंगी कठोर होऊन वडिलांना न सांगता तुकारामला घेऊन संभाजीनगरला आले.

दहावीची परीक्षा आटोपली की तुकाराम परत आपल्या गावला वडिलांना शेतीत मदत करायला जायचा. अकरावीला छत्रपती संभाजी नगर येथे तुकारामांनी एसबी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आतापर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते. पण अकरावी विज्ञानचे शिक्षण मात्र इंग्रजीतून होते. अर्थातच जेवढी पाहिजे तेवढी पक्की यांची इंग्रजी चांगली नव्हती. वडील भाऊ श्री अशोकराव वेळोवेळी मदत करीत होते. तुकाराम यांनी आपली इंग्रजी चांगली करण्यासाठी ग्रंथालयांमध्ये बसण्याची व इंग्रजीच्या सराव करण्याची सोय करून घेतली. त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजी या विषयाची त्यांची दोस्ती व्हायला लागली. मित्रांमध्ये रमण्यापेक्षा पुस्तकांमध्ये रमलेले केव्हाही चांगले. हे त्याला कळून चुकले होते. मित्रांनाही ते क्वचितच भेटायचे .ज्या दिवशी भेटायचे ठरले असेल आणि एखादा मित्राने जर येण्यासाठी विलंब केला तर त्याला तिथे टोकायचे. तू ही वेळ दिली होती .ती वेळ पाळली नाही. त्यांच्या स्वभावामध्ये जो स्पष्टवक्तेपणा त्यावेळेस होता तो आजही कायम आहे.

एक वर एक वेळ तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. वडील बंधू श्री अशोकराव गावाकडे गेले होते. दोन दिवसात परत येतो म्हणून सांगून गेले होते. पण ते आले नाहीत. तुकाराम जवळ पैसे पण नव्हते. आता जेवण कसे करणार. पोटात कावळे ओरडत होते. पण म्हणतात ना कठीण समय येता कोण कामास येतो .त्याप्रमाणे अशोकरावांचा एक मित्र खोलीवर आला. त्याला तुकारामाची परिस्थिती जाणवली. आणि अशोकराव तोडसान्ना वरून परत येईपर्यंत त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने तुकारामची व्यवस्था केली.

एक वेळची गोष्ट आहे की एका रात्री तुकाराम यांना मलेरियाची लागण झाली. ताप वाढला. अंग थरथरू लागले .वरिष्ठ बंधू श्री अशोक रावांना हे लक्षात आले. ते त्याला दवाखान्यात देण्याचा विचार करून घेऊ लागले. पण खिशात पैसे नव्हते. आता काय करावे .अशोकराव एका मुस्लिम बंधू कडे गेले .ते पानाची टपरी चालवत होते. त्यांना २०० रुपये उसने मागितले .तो अशोकरावांच्या परिचित होता. अशोकरावची धावपळ तो पाहत होता. त्याने गल्ल्यातील सगळे पैसे काढले. पूर्ण पैसे मोजले तर लक्षात आले ते फक्त 70 रुपयेच आहेत .पण वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. तुकारामाची प्रकृती वेगाने बिघडत चालली होती. ते त्याला दवाखान्यात घेऊन गेले. ७० रुपयांनी काहीच होणार नव्हते. तुकारामला तीन दिवस दवाखान्यात भरती राहावे लागले .त्या काळात बिल तीनशे रुपये झाले .पण अशोकरावांची इच्छाशक्ती चांगली असल्यामुळे त्यांनी मित्रमंडळीतून तीनशे रुपये जमवले व तुकाराम यांना आजारातून बाहेर काढले.

अशा नाना संकटांना तोंड देत तुकाराम पुढे पुढे जात होते. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे बंधू गरीब जरी असले तरी ते स्वतः काम करायचे. परंतु त्यांनी कधी तुकारामाला कामाला पाठवले नाही. तू फक्त आणि फक्त अभ्यास कर. अभ्यासात तुला या जीवनातून तारू शकेल असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी तयार केला आणि त्यातूनच आजचा तुकाराम घडला.

मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला एडमिशन मिळत असताना सुद्धा अशोक रावांनी आपले कनिष्ठ बंधू श्री तुकाराम यांना कला शाखेत प्रवेश दिला. तो काळ असा होता की त्या काळात स्पर्धा परीक्षेला बसणारी मुले हे विज्ञान घेण्यापेक्षा कला शाखा निवडायचे .कारण कला शाखेतील विषय त्यांना स्पर्धा परीक्षेच्या उपयोगी पडायचे. तुकारामला सोयीचे जावे म्हणून वडिलांनी वडील भावांनी सातशे रुपये खर्च करून सायकल घेऊन दिली. सायकल घेतल्यानंतर तुकारामांना आनंद झाला. कारण की त्या काळात सायकल असणेही म्हणजे श्रीमंतीचे लक्षण होते .सायकल घेतल्यामुळे वेळ वाचायला लागला.

याच दरम्यान एक चांगली गोष्ट घडली. तुकारामाचे वडील बंधू श्री अशोकराव यांना तहसीलदार म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे रुजू होण्याची ऑर्डर मिळाली.

बंधू तहसीलदार झाल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. वडील बंधू श्री अशोकराव यांनी इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासच्या जबाबदारी तुकारामवर दिली. तुकारामाची इंग्रजी तोपर्यंत चांगली झाली होती .तो वादविवाद स्पर्धेत भाग घेऊ लागला होता आणि त्याचा आत्मविश्वास देखील वाढलेला होता .महाविद्यालयामध्ये प्रा. डॉ.मोहम्मद फैयाज यांनी त्याला भरपूर मदत केली.

कॉलेजमध्ये असताना तुकाराम वर्गात वेळेच्या आधी यायचा .शिस्तीत बसायचा. तसेच वर्गात जे शिकवले जायचे त्याचा तो अगोदरच्या दिवशीच अभ्यास करायचा. त्यामुळे तो प्राध्यापकांमध्ये प्रिय होता.

एकवेळ प्राध्यापकांनी शिकवताना चूक केली. तुकारामाने ती त्यांच्या लक्षात आणून दिली. परंतु प्राध्यापक ऐकायला तयारच नव्हते. ते म्हणाले माझेच बरोबर आहे. तुकारामला शंभर टक्के माहीत होते की प्राध्यापकांनी चूक शिकवले आहे. दुसऱ्या दिवशी प्राध्यापकांनी आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी तुकारामांना शाबासकी दिली.

श्री तुकाराम मुंढे यांचे व्यक्तिमत्व असे घडत होते. खूप विपरीत परिस्थिती होती. पण त्या विपरीत परिस्थितीवर मात करून हा माणूस आज महाराष्ट्रातील चांगला सनदी अधिकारी म्हणून ओळखला जायला लागला आहे. ते त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे कार्यरत्परतेमुळे व न्यायाच्या बाजूमुळे..

 

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा