You are currently viewing सावंतवाडीत २३ जुलै रोजी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम

सावंतवाडीत २३ जुलै रोजी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम

व्यापारी, उद्योजक व खाद्यपदार्थ व्यावसायिकांना सहभागाचे आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम गुरुवार, २३ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे येथील खाद्यपदार्थ तज्ज्ञ, अन्नपदार्थ सल्लागार व प्रशिक्षक अकुंश जोगदंड हे मार्गदर्शन करणार आहेत. सुरक्षित अन्न, अन्नसुरक्षा नियम, प्रमाणपत्र प्रक्रिया, आरोग्य संरक्षण तसेच खाद्य व्यवसायाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी किराणा दुकानदार, हॉटेल, खानावळ, बेकरी, मिठाई, कोल्ड्रिंक्स, स्टॉलधारक, मासे, चिकन, अंडी, मटण विक्रेते, दूध विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते, फरसाण उत्पादक, भट्टी व्यवसायिक, वडापाव, समोसा, भजी, चहा विक्रेते, केटरिंग व्यावसायिक, विविध प्रकारच्या धान्यांपासून पीठ तयार करणारे तसेच पाणी बाटली व पाणी विक्री करणारे व्यावसायिक आदींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहताना नोंदणीसाठी आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. संबंधित व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे गांभीर्याने पाहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा