You are currently viewing खासदार विनोदजी तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात भव्य महारोजगार मेळावा उत्साहात संपन्न

खासदार विनोदजी तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात भव्य महारोजगार मेळावा उत्साहात संपन्न

*खासदार विनोदजी तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात भव्य महारोजगार मेळावा उत्साहात संपन्न*

वैभववाडी,

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार मा. विनोदजी तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला भव्य महारोजगार मेळावा उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला. रोजगारासह स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधी युवक-युवतींपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि मुंबईसह विविध भागांतील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मेळाव्याचे उद्घाटन भगीरथ विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे होते. सदर महारोजगार मेळाव्याचे आयोजन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव श्री. प्रमोद रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास व रोजगार नियुक्ती कक्षाच्या वतीने करण्यात आले होते.
उद्घाटक डॉ. प्रसाद देवधर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी शोधण्याबरोबरच युवकांनी स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडेही सकारात्मक दृष्टीने पाहावे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार व उद्योगाच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा महारोजगार मेळावा अत्यंत स्तुत्य आणि काळाची गरज असलेला उपक्रम आहे.
आयोजक श्री. प्रमोद रावराणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन स्वतःचे करिअर घडवावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत रोजगारनिर्माते बनावे, हीच या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणा आहे.”
या महारोजगार मेळाव्यास एकूण १३५ युवक-युवतींनी नोंदणी केली. त्यामध्ये वैभववाडी तालुक्यातील ५८ तर देवगड, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, कणकवली, खारेपाटण, कोल्हापूर आणि मुंबई येथील ७७ उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
या मेळाव्यात ॲक्सिस बँक, आय.सी.आय.सी.आय बँक, एन.आय.आय.टी लिमिटेड, टाटा ए.आय.जी जनरल इन्शुरन्स, स्टार युनियन दाईची लाइफ इन्शुरन्स, टाटा ए.आय.ए मुंबई तसेच कोनो याक सस्टेनेबल या नामांकित कंपन्या व वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि करिअरविषयक मार्गदर्शन करून पात्र उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
याचबरोबर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग; जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग; अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ; महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ; वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ; शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ; तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या प्रतिनिधींनी शासनाच्या विविध स्वयंरोजगार, कर्ज, अनुदान, कौशल्य विकास व उद्योजकता योजनांची सविस्तर माहिती देत युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी प्रास्ताविकातून महारोजगार मेळाव्याच्या उद्देशाचे विवेचन केले. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय रावराणे, विविध शासकीय महामंडळांचे प्रतिनिधी, सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी, वैभववाडी परिसरातील नागरिक, पत्रकार, पालक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा महारोजगार मेळावा अत्यंत यशस्वी ठरला. रोजगारनिर्मितीबरोबरच कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात यावा, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या मेळाव्याचे नियोजन उद्योजकता विकास कक्षचे प्रमुख डॉ. अजित दिघे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा