५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी भाऊ भिसे यांची फेरनियुक्ती करा; नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांची मागणी
रखडलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अनुभवी अभियंत्याची गरज; प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा
सावंतवाडी
शहरात सुरू असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नव्या नळपाणी योजनेचे रखडलेले काम वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पालिकेचे निवृत्त स्थापत्य अभियंता संतोष ऊर्फ भाऊ भिसे यांची तत्काळ फेरनियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
शहरातील या महत्त्वाकांक्षी योजनेचे सुमारे ५० टक्के काम अद्याप अपूर्ण असून, कामाच्या संथ गतीबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर दुभाषी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत अनुभवी अधिकाऱ्याच्या नियुक्तीची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
दुभाषी यांनी सांगितले की, संतोष ऊर्फ भाऊ भिसे यांना २०१० पासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा प्रदीर्घ अनुभव आहे. पाळणेकोंड धरण, केसरी जलशुद्धीकरण केंद्र तसेच नरेंद्र डोंगरावरील वाया जाणारे सुमारे चार लाख लिटर नैसर्गिक पाणी अडवून ते नागरिकांना उपलब्ध करून देण्यासारखी महत्त्वाची कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहेत.
याशिवाय, सध्याच्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) देखील भिसे यांनीच तयार केला असून, या योजनेला मंजुरी मिळण्यासाठी त्यांनी मुंबई येथे विशेष पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रकल्पाला गती देण्यासाठी आणि सावंतवाडीकरांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भाऊ भिसे यांची फेरनियुक्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे दुभाषी यांनी नमूद केले.
प्रशासनाने अद्याप या मागणीची कोणतीही दखल घेतलेली नसल्याची खंत व्यक्त करत, शहराच्या हितासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
