संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न; रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा
सिंधुदुर्गनगरी :
जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व संबंधित विभागांनी अधिक प्रभावी नियोजन करावे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, रस्ते अभियांत्रिकीतील आवश्यक सुधारणा, व्यापक जनजागृती तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना खासदार नारायण राणे यांनी दिल्या.
खा. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच अपघातमुक्त जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने विविध विभागांनी राबविणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली. विशेष अंमलबजावणी मोहिमा, वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी करण्यात आलेली कारवाई, नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती, अपघातप्रवण स्थळांवरील सुधारणा, तसेच विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला.
यावेळी त्यांनी सांगितले की, जानेवारी ते जून २०२५ या कालावधीच्या तुलनेत जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघाती मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. विविध विभागांनी समन्वयाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक सुधारणा, अपघातप्रवण स्थळांवर कायमस्वरूपी उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक उपायांचा अवलंब, रस्ते अभियांत्रिकीतील त्रुटी दूर करणे, तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करावा. रस्ता सुरक्षा ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्य केल्यासच अपघातांमध्ये आणखी घट साध्य होऊ शकते असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
बैठकीस आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव उपस्थित होत्या.
