You are currently viewing नवी उषा

नवी उषा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नवी उषा* 

(वृत :वनहरिणी)

 

काळजातल्या व्यथा वेदना शब्द कधी नच मज सापडले

ओठांवरती हास्य ठेवुनी अश्रू अलगद मग ओघळले

 

घन तिमिरीही आठवणींनी पुन्हा पुन्हा मन व्यापुन गेले

जगासमोरी हसत राहिले, अंतरातुनी हरवुन गेले

 

जपली होती स्वप्नफुले जी काळासोबत सुकून गेली

हातामधल्या रेषांनाही मम विरहाची भाषा कळली

 

शोधत गेले सौख्यकणांना, काट्यांनी पण वाटा भरल्या

नियतीच्या या खेळामध्ये आशा माझ्या पुन्हा विखुरल्या

 

सांज उतरते हळुवारपणे, छायांना बघ कवेत घेते

मन पक्षी त्या आठवणींचे आभाळ पुन्हा शोधु लागते

 

दाटुन आले हुंदके किती मौनात असे विरून गेले

न बोललेल्या शब्दांमधले अर्थ किती अन् खोल उमगले

 

सरतिल हे पण कधीतरी क्षण मनास सांगत मीच राहिले

दुःखाच्या या वादळातुनी धैर्य दीप मी उजळत गेले

 

जखमांवरती काळानेही अलगद फुंकर अशी घातली

नव्या उषेच्या नलकिरणांनी नव‌ आशा उर्मी जागविली

 

 

©️®️डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा