You are currently viewing ‘निसर्ग शाळे’च्या तिसऱ्या पर्वाला उत्साहात प्रारंभ
Oplus_16908288

‘निसर्ग शाळे’च्या तिसऱ्या पर्वाला उत्साहात प्रारंभ

युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स ग्रुपचा उपक्रम; विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन व जैवविविधतेचे प्रत्यक्ष धडे

मालवण :

सध्याच्या आधुनिक युगात मुले निसर्गापासून दूरावत चालली असताना त्यांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन विविध नैसर्गिक घटकांची प्रत्यक्ष माहिती देण्याच्या उद्देशाने युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित ‘निसर्ग शाळा’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ रविवारी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षांना पाणी अर्पण करून करण्यात आली. यावेळी निसर्गशाळेचे नवीन विद्यार्थी, त्यांचे पालक, माजी विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युथ बिट्स फॉर क्लायमेटचे अध्यक्ष मेगल डिसोझा यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत आपण निसर्गाचा अविभाज्य घटक असल्याने त्याचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असून महाविद्यालयाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

निसर्गशाळेच्या शिक्षिका दुर्गा तिघले यांनी उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत पाणथळ जागा, जमिनीचे प्रकार, वनस्पती व बियांची ओळख, पक्षीनिरीक्षण, वन्यजीवांचा अधिवास, कातळ सडा आणि जैवविविधता आदी विषयांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यास करून दिला जात असल्याची माहिती दिली. तर शिक्षक स्वप्नील गोसावी यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल जिज्ञासा निर्माण करून त्यांना निसर्ग समजून घेण्याची प्रक्रिया या शाळेत राबवली जात असल्याचे सांगितले.

यावेळी निसर्ग व वन्यजीव अभ्यासक डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि हिमांशू लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मागील दोन वर्षांतील निसर्गभ्रमंती, अभ्यासदौरे आणि विविध उपक्रमांचे निवडक छायाचित्रे पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कमल बांदकर यांनी केले. निसर्गशाळेत सुरक्षित वातावरणात व प्रशिक्षित टीम सदस्यांसोबत मुले निसर्गाचा अभ्यास करतील, असा विश्वास पालकांना देण्यात आला. आभार चारुशीला देऊलकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा