You are currently viewing “शब्दांच्या पलीकडले” ब्रेल लिपीतील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

“शब्दांच्या पलीकडले” ब्रेल लिपीतील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी, मंडणगड, यांचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

रत्नागिरी :

मराठी शब्दांचा शोध आणि बोध घेणाऱ्या सुरेश ठाकूर (मालवण )लिखित “शब्दांच्या पलीकडले” या पुस्तकाचे ब्रेल लिपीतील प्रकाशन स्नेहज्योती अंध विद्यालय,घराडी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथे नुकतेच संपन्न झाले. या विद्यालयाच्या संचालिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी या पुस्तकाचे ब्रेल लिपी मध्ये रूपांतर केले आहे.या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रामचंद्र आंगणे, माजी उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या हस्ते संपन्न झाला. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी रामचंद्र आंगणे म्हणाले, “प्रतिभा सेनगुप्ता यांनी आज या पुस्तकाचे अंतरंग महाराष्ट्रातील दृष्टिहीन वाचकांपर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या या देवकार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करीत आहे. मराठीतील दर्जेदार ग्रंथ निवडून त्यांचे ब्रेल रूपांतर करून अंध बांधवांना ते ज्ञान देण्याचं पवित्र कार्य त्यांच्याकडून आज झालेले आहे. सुरेश ठाकूर यांचे पुस्तक खऱ्या अर्थाने शब्दांच्या पलीकडे गेलेले आहे.ज्यावेळी एखादे पुस्तक अंध विद्यार्थी वाचू शकतात त्यावेळी त्या पुस्तकालाही कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.”

हा पुस्तक प्रकाशन सोहळा घराडी येथील अतिशय दुर्गम भागात असलेल्या स्नेहज्योती अंध मुलांच्या विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रथमतः या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून नंतर दिलीपकुमार मराठे यांनी लिहिलेल्या” हा वारसा मराठीचा ” हे अभिजात मराठी गीत अतिशय तालसुरात गाऊन कार्यक्रमाचा प्रारंभ केला . याला संगीत साथ सुद्धा दृष्टीहीन मुलांचीच होती. मंडणगड येथील आदर्श शिक्षक दिलिपकुमार मराठे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि पुस्तकाचा सखोल परिचय करून दिला. पुस्तक परिचय करून देत असताना पुस्तकातील अनेक शब्दांचा उहापोह केला आणि त्यातील काही मजकूराचे प्रकट सादरीकरण केले.

त्यानंतर मंडणगड पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून शब्दांच्या पलीकडले हे पुस्तक आता खऱ्या अर्थाने सर्वांना उपलब्ध होत आहे हे सांगितले. तसेच पुस्तकाचे लेखक ठाकूर यांचा गौरव केला. आणि या अंध मुलांच्या शाळेला नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिभा सेनगुप्ता म्हणाल्या की, ‘मी जेव्हा या पुस्तकातील एक भाग वाचला त्याचवेळी तो मनात घर करून गेला. अशा प्रकारचं साहित्य आपल्या दृष्टीहीन मुलांना कसं उपलब्ध करून देता येईल याचा विचार मनात आला. डोळस मुले कधीही कोणतेही पुस्तक वाचू शकतात परंतु ज्यांना दृष्टीच नाही त्यांना या पुस्तकवाचनाचा आनंद कसा घेता येणार?

त्यांना हा आनंद उपलब्ध करून देण्याचा निश्चय करून हे पुस्तक ब्रेल लिपी मध्ये तयार करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. देवनागरी लिपीतील 111 शब्दांच्या कुळ आणि मूळ कथांचे ब्रेल लिपी मध्ये आठ खंड आज प्रकाशित झाले.”

चंद्रशेखर धानजी,सेवा निवृत्त चीफ असोसिएट, स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आलेल्या अनेक संदेशांचे वाचन केले.

सदर प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी पूजा आणि कुमारी चैत्राली यांनी पुस्तकाच्या काही भागाचे वाचन करून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमास मामा पोटफोडे, विजय जोशी, सचिन सेठ, सचिन माळी, फणसेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी उत्तमकुमार जैन, प्रतिभा वागळे, देव्हारे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र रेवाळे, घराडी केंद्राचे केंद्रप्रमुख भाऊसाहेब फुले, शिक्षक दिलीपकुमार मराठे,शांताराम पवार, सुनील आईनकर, नितीन लंबे, मनेष व्याघरांबरे ,मंडल अधिकारी दिनेश गोडघासे, विद्यालयाचे सर्व शिक्षकबांधव,पदाधिकारी, आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन उत्तमकुमार जैन यांनी केले.

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगसुंदर गीतचमुने गायलेल्या ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि गर्जा महाराष्ट्र माझा ‘या गीत गायनाने प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा