तिथवलीच्या ग्रामस्थांचा वीज वितरण कार्यालयावर पाच तास ठिय्या; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर संताप; नासीर काझींचा आक्रमक पवित्रा, कार्यकारी अभियंत्यांच्या चर्चेनंतर तोडगा काढण्याचे आश्वासन
वैभववाडी
तिथवली परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येविरोधात ग्रामस्थांनी बुधवारी वैभववाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. माजी सभापती नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे यांनी घटनास्थळी येऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
तिथवली व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि पाणीपुरवठा यंत्रणेला मोठा फटका बसत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
बुधवारी सकाळी सुमारे ११.४५ वाजता ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालय गाठले. स्थानिक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले. “कार्यकारी अभियंता येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम पवित्रा नासीर काझी व आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर जोरदार टीका करत जीर्ण वीज खांब, जीर्ण वीजवाहिन्या, अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
वैभववाडीचे उपअभियंता बदली होऊन महिनाभर उलटूनही त्यांच्या जागी नवीन अधिकारी नियुक्त न झाल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर लवकरच नवीन अधिकारी रुजू होतील, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या वायरमनविरुद्ध नोटीस काढून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शर्पे–तिथवली पर्यायी वीजवाहिनीबाबत सर्वेक्षण करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनात पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, महेश संसारे, इब्राहिम काझी, जयराज हरयाण, महादेव हरयाण, ओंकार हरयाण, अनिकेत कुडतरकर, मजीद सोलकर, रोहिण कुडाळकर, विजय कुडतरकर, अनिल हरयाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
