दोडामार्गला वादळी पावसाचा तडाखा; घरे, वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान
कोलझर, तळकट, मोरगाव, कुंब्रल, साटेली-भेडशी परिसरात झाडे कोसळली; अनेक गावे अंधारात, तातडीने पंचनामा व मदतीची मागणी
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात सोमवारी सायंकाळी सुमारे ५.३० ते ६.०० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी पावसाने अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढले. कोलझर, तळकट, मोरगाव, कुंब्रल आणि साटेली-भेडशी परिसरात झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुका पुन्हा एकदा अंधारात बुडाला आहे.
कोलझर गावातील आनंद चिंतामण पास्ते यांच्या घरावरील पत्रे वादळाच्या तडाख्याने उडून गेली. त्याचवेळी मोठे झाड घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. घरातील इलेक्ट्रिक उपकरणे, कपडे, कडधान्ये तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
मोरगाव-बागवाडी येथे ठाकूर यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कुंब्रल येथील दादू यशवंत गवस यांच्या राहत्या घरावर माडाचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले. या घटनेची महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
तळकट येथे रामदास देसाई तसेच गाड यांच्या घरांवरही झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.
दरम्यान, तळकट-कोलझर-मोरगाव पंचक्रोशी परिसरात संध्याकाळपर्यंत वादळाचा जोर कायम होता. अनेक ठिकाणी मोठी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या आणि वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला.
साटेली-भेडशी परिसरातही वीज वितरण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.
आधीच वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येमुळे त्रस्त असलेल्या दोडामार्ग तालुक्याला या वादळाने आणखी मोठा फटका दिला आहे. वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
