You are currently viewing पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन नोंदणी सुरू

पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन नोंदणी सुरू

पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन नोंदणी सुरू

*भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शासकीय स्क्रूटनी सेंटर*

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष चार वर्षीय पदवी अभियांत्रिकी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या वर्षी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘ई-स्क्रूटनी’ आणि ‘फिजिकल स्क्रूटनी’ असे दोन पर्याय देण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे शासकीय मान्यताप्राप्त स्क्रूटनी सेंटर-३४७० उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १२ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील स्क्रूटनी सेंटरवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चितीची प्रक्रिया १३ जुलै सायं.५ वाजेपर्यंत राबवली जाईल. १५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून त्यावर हरकती नोंदवण्यासाठी १६ ते १८ जुलै पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. सर्व आक्षेपांचे निवारण करून २० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियमांनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी वैध जात/जमात वैधता प्रमाणपत्र व ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असलेले नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील केंद्राशी (हेल्पलाईन क्र. 9604272566) संपर्क साधावा असे आवाहन सक्षम प्राधिकार्‍यांमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा