You are currently viewing सावंतवाडीत प्लास्टिकबंदीविरोधात धडक कारवाई; आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

सावंतवाडीत प्लास्टिकबंदीविरोधात धडक कारवाई; आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

सावंतवाडीत प्लास्टिकबंदीविरोधात धडक कारवाई; आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

नगरपरिषदेच्या विशेष मोहिमेत नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांकडून दंड वसूल; कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन

सावंतवाडी :

महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिकबंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने मंगळवारी (दि. ३०) शहरातील आठवडा बाजार परिसरात विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविली. या धडक कारवाईमुळे नियमबाह्य प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
स्वच्छता विभागाच्या पथकाने आठवडा बाजारातील भाजी विक्रेते, व्यापारी आणि इतर दुकानदारांची तपासणी करून शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या, सिंगल युज प्लास्टिक आणि इतर नियमबाह्य प्लास्टिक साहित्य जप्त केले. तसेच संबंधित विक्रेत्यांकडून नियमानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाला चालना देणे, प्लास्टिकचा वाढता वापर रोखणे आणि सावंतवाडी शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी सर्व व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी प्लास्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा तसेच इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, आगामी काळात प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमित तपासणी करून कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा