You are currently viewing महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांचे १ जुलैला आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन

महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांचे १ जुलैला आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन

महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांचे १ जुलैला आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्या, शासनाच्या धोरणांविरोधात एल्गार; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर, किमान ₹३० हजार मानधनासह विविध मागण्या

सिंधुदुर्ग 
शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरोधात तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल स्तरीय महा ई-सेवा केंद्र व आधार केंद्र राज्य संघटनेच्या वतीने मंगळवार, १ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर केले.

संघटनेच्या मते, मार्च महिन्यात झालेल्या आंदोलनावेळी शासनाने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवत असतानाही त्यांना मानधन, आर्थिक संरक्षण किंवा आवश्यक सुविधा मिळत नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली. प्रत्येक ग्रामपंचायतीत नवीन केंद्रांना आयडी देण्याच्या निर्णयामुळे मूळ केंद्र चालकांच्या रोजगारावर गदा आल्याचा आरोपही करण्यात आला.

तसेच, नवीन जीपीआर धोरण, पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी, आधार ऑपरेटरना चौकशीशिवाय ब्लॅकलिस्ट करण्याची पद्धत, ऑनलाइन दाखल्यांतील अडचणी, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीतील त्रुटी याकडे संघटनेने शासनाचे लक्ष वेधले आहे.

संघटनेने सर्व व्हीएलई केंद्र चालकांना दरमहा किमान ३० हजार रुपये मानधन किंवा समतुल्य आर्थिक संरक्षण, विमा संरक्षण, नव्याने मंजूर झालेल्या केंद्रांची चौकशी, अतिरिक्त संगणक वापरण्याची परवानगी, शासकीय कॅम्पसाठी प्रवास व दैनिक भत्ता, टोल-फ्री हेल्पलाइन सुरू करणे आणि शासन-प्रशासन-সংघटना यांच्यात नियमित समन्वय बैठका घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राज्य प्रतिनिधी संदेश कल्याणकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यापूर्वी केंद्र चालकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत संयुक्त बैठक आयोजित करून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलली होती. त्याबद्दल संघटनेने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले असून, राज्यस्तरीय मागण्यांसाठी १ जुलैचे आंदोलन कायम असल्याचे स्पष्ट केले.

निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद डिचोलकर, राज्य प्रतिनिधी संदेश कल्याणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रमोद नाईक, खजिनदार सीमा मठकर, सुनीता आईर, सचिव श्रेयस मुंज, कुडाळ सचिव प्रवीण सावंत, मळगाव केंद्र चालक खडपकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा