*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*यशाहुनीही प्रयत्न सुंदर..*
खरं आहे, यश पुढे पुढे पळत असतं व प्रयत्न
मागे मागे धावत असतात. हा पकडापकडीचा
खेळ आयुष्यभर चालत असतो हे आपण सगळेच
अनुभवत असतो, यातून कुणाचीही सुटका झाली
नाही मग तो राव असो वा रंक. प्रत्येक जण यशावर झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न
करतोच करतो. कुणाची पकड घट्ट बसते तर कुणाची ढिली पडते व त्याला यश हुलकावणी
देते.
माझेच उदा. पहा ना. एफ वाय बी एला असतांनाच लग्न झाले. संसाराला लागले. शिक्षण
सोडायचे नव्हतेच. एक वर्ष धुळ्यातच एस वाय
करून घेतले. १९६९ ला नाशिकला आलो. ७०/७१ ला मुलाला झोळीत टाकून झोळी हलवत मी बी ए च्या अभ्यासाला लागले. दोन
वर्षांचा गॅप. आत्मविश्वास शून्य. पण प्रयत्न
शंभर टक्के. म्हणून तर म्हटले, यश पुढे व मी
मागे. काहीच कळत नव्हते. अवघे २१/२२ वय.
पण माहीत नाही अशी कोणती प्रेरणा होती की जी मला
शिकायला भाग पाडत होती. खूप विचार करावा
व निर्णय घ्यावा एवढे माझे वय नक्कीच नव्हते.
तरीही मी पुढे पुढे जात राहिले. अनंत अडचणी
सोसत सतत पायपीट करत मी शिकत होते. यश
अपयशाचा कधी विचार केला नाही की परिणामांची भीती बाळगली नाही. चालत होते,
चालत होते. प्रयत्नात कसूर केली नाही. परिणामांचा विचार केला नाही. वडिलांना मी सांगत असे मी एम ए होणार नि झाले. पुढे बी एड
ही झाले. पास नापासाची कधी चिंता केली नाही.
एकच माहित होते अभ्यास करायचा बस्स!
आज सारे डोळ्यांसमोर येते. चित्रपटच दिसतो म्हणाना. लहान मुलगा, शेजारी किल्ली दिलेली.
मी कॅालेजात तास अटेंड करते आहे. आता नवल
वाटते, कसे केले आपण? ह्या प्रयत्नांचा आज आनंद व अभिमान वाटतोच पण तेव्हाही आपण
त्रासात आहोत असे कधी वाटले नाही. जिद्द होती,
उर्मी होती. ती जिद्दच यशाकडे घेऊन गेली नि
सुखच सुख घेऊन आली. तेव्हा हे प्रयत्न केले नसते तर.. कल्पनाही करवत नाही. जीवनाला
कोणती दिशा मिळाली असती ते!
आपल्या एवढ्या एवढ्या नखभर प्रयत्नांचे केवढे
कौतुक वाटते आपल्याला. पण जिजाऊ अहिल्याबाई ताराबाई येसूबाई झाशीची राणी
ही सारी नावे आठवताच व त्यांचा काळ व त्यांच्यापुढील अडचणी आठवल्या तरी मनाला
कापरे भरते. बाईमाणूस आहे, सहज शरण येईल
असे मांडे खात राघोबा अहिल्याबाईंचे राज्य गिळू
पहात होता व तशी स्वप्ने पहात होता. त्याच्या
हालचाली कळताच अहिल्याबाईंनी तलवार उपसली व महिलांची सेना तयार करून राघोबाला बांगड्या भेट पाठवून चाल करून यायचे आवाहन करताच महिलांपुढे हरलो तर
नाचक्की होईल या भितीने राघोबा परत फिरला.
इथे, हतबल न होता धैर्याने सामोरी जाण्याची
अहिल्याबाईंची हिंमत व प्रयत्न महत्वाचे ठरतात.
परिणाम काय होतील याची त्यांनी चिंता केली नाही. शत्रू कुणीही असो. राज्य तर राखलेच पाहिजे ना? त्यांनी तयारी केली नि सिद्ध झाल्या.
शत्रूच्या तोंडचे पाणी पळाले. पुढे काय होईल याची चिंता न करता माणसाने प्रयत्न चालू ठेवायचे असतात. आयुष्यभर या ना रित्या माणसाला प्रयत्न करावेच लागतात.शेवटी प्रयत्नांती परमेश्वर या न्यायाने तो यशाला गवसणी घालतोच. प्रयत्न मात्र हवेतच. ही धडपड
जीवनात नसेल तर माणसाचे जीवनच बेचव होऊन जाईल.आमच्या मावळ्यांच्या प्रयत्नांना तर सीमाच नव्हती. बलाढ्य औरंगजेबालाही त्यांनी जेरीस आणले. आज त्यांच्या प्रयत्नांची गाथा आम्ही अभिमानाने मिरवतो.त्यांचे प्रयत्न किती सुंदर होते याला इतिहास साक्षी आहेच पण मुठभर मावळ्यांचे यश किती महान होते
याचाही इतिहास साक्षीदार आहे.
म्हणतात ना.. “ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता
तेल ही गळे”.. खरे आहे. इवलाली चोच असलेला
सुगरण पक्षी अथक प्रयत्नाने झाडाला किती सुंदर झुलता बंगला टांगतो. एकेका झाडावर शेकडो घरटी झोका खातांना दिसतात. ते गवत
आणण्यासाठी त्याला शेकडो भराऱ्या तर माराव्या
लागतातच पण मादी सुग्रण प्रसन्न नाही झाली
तर पुन्हा नवे घरटे विणावे लागते. पसंती होताच
मग चिमणी बाळे त्या झुलत्या बंगल्यात जन्म
घेतात. त्याच्या अथक प्रयत्नांचे सार्थक होते.
हे यशामागील प्रयत्नांचे गमक आहे. प्रयत्न व
सराव माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जातात.
यश नजरेच्या टप्यात येई पर्यंत माणूस प्रयत्न
कधीही थांबवत नाही कारण” थांबला तो संपला”.
एव्हरेस्टवरच्या मोहिमा पाहिल्या की मन थक्क
होते व सुन्नही होते. जीवावर उदार होऊन ह्या
मोहिमा राबवल्या जातात. ते गिर्यारोहक पाहून
आपला जीव मुठीत गोळा होतो.केवढी ती जिद्द!
जीवापाड मेहनत.आणि मग एव्हरेस्टवर फडफडणारा तो आपला तिरंगा पाहून देश व गिर्यारोहक यांच्याविषयी मनात दाटून आलेला
अभिमान. सारे काही अद्भूत वाटते.पण त्यामागे
असतात अथक परिश्रम. अनेक यशोगाथांच्या मागे हे परिश्रमच दडलेले असतात त्या शिवाय
यशाला गवसणी घालताच येत नाही.म्हणूनच..
….” यशाहुनीही प्रयत्न सुंदर
…..मानवतेचे महान “बंदर”
…..येथ जहाजे हलती डुलती
….माणूस आहे फार बिलंदर..,
… हलतो डुलतो तो धडपडतो
… पाऊल पुढे पण सदा टाकतो
….मुंगी सारखे शतदा पडूनी
…. यशशिखरावर आरूढ होतो…
….. म्हणून म्हणती माणूस त्याला
…… संकटास तो कधी न भ्याला
….. अथक परिश्रम मानवतेचे
….. खरा शोभतो देवाचा चेला..,
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
