You are currently viewing कुडाळात ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा साकारणार

कुडाळात ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा साकारणार

कुडाळात ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा साकारणार

५० कलाकारांच्या सहभागातून ऐतिहासिक क्षणाचा जिवंत अनुभव; २७ जून रोजी मराठा समाज हॉलमध्ये भव्य आयोजन

कुडाळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या निमित्ताने कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये भव्य-दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती संयोजक विवेक पंडित आणि संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात एमआयडीसी विश्रामगृह, कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेला विवेक पंडित, संध्या तेरसे, राजू राऊळ, बंड्या सावंत, डॉ. कमलेश चव्हाण, डॉ. बापू भोगटे, शिवम म्हाडेश्वर, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.
संयोजक विवेक पंडित यांनी सांगितले की, रायगडावर ३५२ वर्षांपूर्वी पार पडलेला शिवराज्याभिषेक सोहळा जशास तसा रंगमंचावर साकारला जाणार आहे. त्या काळातील सरदार, उमराव आणि राजदरबाराचे वातावरण हुबेहूब उभे केले जाणार असून उपस्थितांना इतिहासाचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
रविराज पराडकर उलगडणार शिवराज्याभिषेकाची ऐतिहासिक गाथा
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक तथा इतिहास संकलन समितीचे उपाध्यक्ष रविराज पराडकर यांचे मार्गदर्शन. त्यांच्या ओघवत्या निवेदनातून शिवराज्याभिषेकाचा इतिहास, त्यामागील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांसमोर उलगडले जाणार आहे.
इतिहासतज्ज्ञांच्या हस्ते उद्घाटन, मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे उद्घाटन इतिहासतज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते होणार असून हेमंत मुजुमदार कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री Nitesh Rane आणि आमदार Nilesh Rane यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सिंधुदुर्गात प्रथमच असा भव्य हिंदू साम्राज्य दिन सोहळा
संध्या तेरसे यांनी सांगितले की, रविराज पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५० हून अधिक स्थानिक कलाकार शिवराज्याभिषेकाचा नेत्रदीपक रंगमंचीय आविष्कार सादर करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू साम्राज्य दिनानिमित्त अशा स्वरूपाचा भव्य सोहळा प्रथमच आयोजित करण्यात येत असून शिवप्रेमींना ऐतिहासिक सुवर्णक्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
शनिवार, २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा