गोव्यातील गिरी येथून भिरवंडेकडे जाताना दुर्घटना
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात आज दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. गोव्यातील गिरी येथून कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथे जात असताना जीए-०३-एएम-८४७८ क्रमांकाच्या थार कारचा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, थार कार नेमळे मार्गावरून कणकवलीच्या दिशेने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वाहनाचा वेग अधिक असल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन जोरदार धडकली. या धडकेत वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात श्रीमती नानोडकर (वय ४३, रा. गिरी-गोवा) आणि विलासिनी सातार्डेकर (वय ५३, रा. भिरवंडे-कणकवली) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर सनी नानोडकर (वय ४०, रा. गिरी-गोवा), उज्वला कांबळी (वय ५०, रा. गिरी-गोवा) आणि पांडुरंग नानोडकर (वय ६५, रा. गिरी-गोवा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत घोट्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक आणि निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झोबियर फर्नांडिस, नेमळे ग्रामस्थ तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत तसेच परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. दरम्यान, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना धीर देत मदतीचा हात दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मृत महिलांवर पुढील कायदेशीर सोपस्कार सुरू असून या अपघातप्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
