*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक, अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*
*बाबा…*
*...घराचा कणखर कणा*
बाबा ही जरी एक व्यक्ती वाटली तरी ती अथांग भावना आहे; बाहेरून शहाळ्यासारखी कठीण आतून मऊ, गोड, रसाळ, शुभ्र धुक्यासारखी निर्मळ…! बाबा शब्दांत वर्णन करणे कठीणच… मुलांच्या काळजीने कडक भासले जरी क्षणात डोळे भरणारे, अत्यंत हळवे, प्रेमळ अन् मायाळू व्यक्तिमत्व. आई घरची लक्ष्मी, मांगल्य असते पण.., बाबा घराचे अस्तित्व… आईला स्वातंत्र्य असतं हळूच अश्रूंना गाळून मोकळं होण्याचं पण, बाबा मात्र लपवतात अश्रू पापण्यांच्या आड खोल डोहात आणि जबाबदारीचं ओझं डोईवर घेऊन नकळत हसतात गालात.. जणू एक संपूर्ण त्यागमूर्तीच..!
बोट धरुनी चालाया, बोल बोबडे बोलाया शिकवते आई पण.., जो खांद्यावर घेउनी जग दाखवतो तो बाप असतो.. अन् तो हळवा बाप कुठे कुणाला कळतो…?
एखाद्याचा बाप काढणं खूप सोपं असतं पण, मुलाचा बाप बनणं सुद्धा कितीतरी कठीण. कारण, बाप काढताना फक्त शब्दांचे बाण सोडावे लागतात अन् बाप बनताना कित्येकदा बाणासारखे शब्द अलवार झेलावे लागतात कधी नजरेसमोर, कधी पाठीवर कधी तोंडावर सुद्धा..! पण, जेव्हा शब्द छातीवर अन् छाताडाच्या आत असलेल्या कोमल हृदयावर वार करतात तेव्हा बापाच्या डोळ्यातूनच नव्हे तर रंद्रारंद्रातून पाण्याचे पाट पाझरतात…
बाबा बनण्याची स्वप्ने तो नेहमी पत्नीच्या डोळ्यात पाहत असतो… अन् जेव्हा ती असह्य प्रसव वेदनांनी तळमळते, कासावीस होते तेव्हा तो तिच्या कण्हण्याने, किंचाळण्याने तिळ तिळ तुटत असतो. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने त्याचे मुखकमल खुलते पण पत्नीची आठवण येताच डोळे डबडबतात.. सरितेला पूर यावा, काठ पाण्याने भरून जावा… तशा पापण्या दुथडी भरून वाहू लागतात…हे आनंदाश्रु की पत्नीला होणाऱ्या वेदनांनी ओघळणारे दुःखाश्रु त्याचे त्यालाही कळत नसतात.. फक्त डोळे अखंडित वाहत राहतात, खडकाला पाझर फुटावा तसेच.. तिथेच मिळते एक जिवंत उदाहरण पुरुष, बाबा होतानाचे..!
*बाप हा बाप असतो..*
*चिडला जरी क्षणभर, मनाने साफ असतो.*
लाजरीच्या रोपट्याला तीक्ष्ण काटे असतात, पण, तिच्या लालसर कोमल भासणाऱ्या पानांना स्पर्श करताच किंवा हळुवार फुंकर मारताच लाजरी आपल्या पाकळ्या अलगद मिटून घेते… त्या लाजरी इतकाच हळवा असतो बाबा आपल्या लेकरांसाठी…! बालिश, भाबड्या असलेल्या त्याच्या लेकरांना बाबा रागाने ओरडतो, किंचितसे दुखावतो, तो ‘क्षणभराचा राग’ सुद्धा मुलांचं आयुष्य घडावं याच हेतूनं आलेला असतो. परंतु, तरीही क्षणभरात भानावर येत लेकराला अलगद कुशीत घेतो, माथ्यावर, गालांवर गोड पापा देतो अन् नकळत नेत्र पापण्यांतून आसवांची बरसात करतो आपल्याच गालांवर काही क्षण. बाबा नि लेकरांच्या अपार प्रेम अन् काळजीचा तो क्षण दोघांच्याही नात्यातील अनमोल क्षण ठरतो.
*रंग त्याचा काळवंडतो उन्हातान्हात कधी*
*तो बापाच्या आजन्म कष्टाचाच राप असतो…*
…बापाचं अवघं विश्व म्हणजे आपलं कुटुंब.. पत्नी अन् लेकरं… माथ्यावर आग ओकणाऱ्या सूर्याची प्रखर किरणे सुद्धा बाबाला आपल्या जबाबदारीसमोर पहाटेच्या सोनसळी कोवळ्या किरणांसारखीच भासतात…कष्टाने जेव्हा तो घामेजतो, अंगावरून त्याच्या कष्टाची पोचपावती देणाऱ्या घामाच्या धारा वाहतात तेव्हा त्याची नितळ कांती उन्हाने चकाकत अन् आतल्या आत करपते, काळवंडते, रापते…तरी आपल्याला कुठे बाबाच्या कष्टाची किंमत कळते..? पण, त्या काळवंडलेल्या शरीराला पाठीवर लेकराची घट्ट गळा मिठी पडते ना… तेव्हा बाबा खऱ्या अर्थाने सुखावतो. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हास्य कितीही किंमत मोजली तरी कुठल्या बाजारपेठेत विकत भेटणार नाही एवढं मौल्यवान असतं.
घर, कुटुंबापुढे संकटे बाबासाठी किरकोळ असतात. कुटुंबाच्या गरजांसाठी त्याचे खांदे तो अधिक मजबूत करतो. तो सहज पेलतो अवघड वाटणारं संकट लिलया आपल्या बाहुंवर मुखातून कुठलाही हुंकार, फुत्कार न काढता. त्याच्या बाजूंमध्ये एवढी ताकद कशी येते याची चौकशी करतात तेव्हा तो म्हणतो, “पत्नी, लेकरांच्या चेहऱ्यावरील खुशी हीच माझी प्रथिने आणि कर्बोदके आहेत, तीच माझ्या बाहुंत ताकद भरतात. बाबाच्या मनात विचारांचं वादळ घोंगावत असतं, तरीही त्याचा चेहरा विचलित होत नाही… तो सतत संवाद साधत असतो “मी आहे ना, काळजी करू नका,”… त्याचे हे धीराचे शब्द कुटुंबाला सुद्धा संकटावर मात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देतात. इतकी सकारात्मकता बाबाच्या विचारांमध्ये ओतप्रोत भरलेली असते.
*स्वतः जळून कुटुंबाला प्रकाश देणारा दिवा..म्हणजे बाबा*.
नात्यांच्या भिंती रचून घर उभे राहते पण…, घराचा भार पेलणारा दगड मातीचा मजबूत पाया बाबा असतो. कधी दगड बनून घट्ट पाय रोवून उभा राहतो, माती होऊन दगडासारखी कठीण, ओबडधोबड झालेली नाती टिकवून, एकसंध बांधून ठेवतो; भांडण, तंटे, वाद विवाद म्हणजेच वादळ, वारा, पाऊस सहज थोपवतो. घराला ऊन पावसापासून वाचवताना, कुटुंबाला सावली देताना बाबा घराचे छप्पर बनतो. कडक उन्हाळा, सोसाट्याचा वारा नि मुसळधार पाऊस आपल्या अंगा खांद्यांवर स्वतः सोसतो. कुटुंब अंधारात चाचपडताना बाबा पणती होतो, वात बनून स्वतः जळतो, प्रकाश होऊन दिशा दाखवतो..
बाबा कुणाकडून अपेक्षा बाळगत नाही की, कुणाच्या ऋणात राहत नाही. घराचा भार, आर्थिक विवंचना, मुलांचे शिक्षण, चिंता बाबा एकटाच वाहतो पण, कष्टाची रेघ कधीही चेहऱ्यावर दिसू देत नाही.
सूर्य जसा स्वतः जळून जगाला प्रकाशमान करतो तसाच बाबा राबत असतो कुटुंबासाठी, मुलांसाठी.. स्वतः कष्ट उपसून मुलांचे आयुष्य उजळून टाकतो. *”नमतो जो चरणांवर बापाच्या तो जीवनभर आफताब असतो…”* अशा बाबांच्या चरणी जो झुकतो तो सुद्धा सूर्यासारखा तेजस्वी बनतो, चमकतो अन् समाजात मानसन्मान मिळवतो. परंतु…, *”जो विसरतो बाबाला…आयुष्य त्याच्यासाठी पश्चात्ताप असतो”* कारण, जन्मदात्या बापाला विसरणे म्हणजे कृतघ्नतेच्या खोल दरीत पडण्यासारखे आहे. पायाला विसरून वर भक्कम इमारत उभी राहूच शकत नाही…आणि पैसा, प्रसिद्धी सगळं काही पुन्हा मिळवता येऊ शकतं, पण बाबांचा तो आश्वासक हात आणि त्यांचा मायेचा कडकपणा एकदा निसटला, की तो जगाच्या पाठीवर कुठेच परत मिळत नाही.
म्हणून तर म्हटलंय…..
*घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रं…*
*लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप रं…!*
पाठीचा कणा जसा संपूर्ण शरीराला ताठ उभं राहण्याची ताकद देतो, तो स्वतः दिसत नाही पण त्याच्याशिवाय शरीर उभं राहू शकत नाही; अगदी तसंच कुटुंबात असतं बाबांचं स्थान…जणू घराचा कणखर कणा…!
🖊️ दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
