आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडीत विविध ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन
पतंजली योग समितीचा पुढाकार; शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांमध्ये होणार योगाभ्यास
सावंतवाडी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून रोजी सावंतवाडी पतंजली योग समितीच्या वतीने शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी योग शिबिरे व सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात योगाचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने सावंतवाडीतही व्यापक स्वरूपात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
योग ही आरोग्यदायी जीवनशैली
योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक स्वास्थ्य सुधारते, मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते तसेच सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते. या उद्देशाने पतंजली योग समितीने विविध शैक्षणिक, शासकीय आणि सामाजिक संस्थांमध्ये योग दिन कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शहरातील विविध संस्थांमध्ये कार्यक्रम
सावंतवाडी शहरातील पोलीस स्टेशन, मराठा हॉस्टेल, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल, भोसले नॉलेज सिटी, वेद पाठशाळा (भटवाडी), सुधाताई कामत शाळा क्रमांक २, पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४, मिलाग्रीस हायस्कूल तसेच बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेज येथे योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
योगाचे महत्त्व पटवून देणार
या कार्यक्रमांमध्ये पतंजलीचे प्रशिक्षित योगशिक्षक सामूहिक योगाभ्यास, विविध योगासनांची प्रात्यक्षिके तसेच योगाचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या योग दिन कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
