पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; दीड वर्षात दर्जेदार प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
कणकवली :
जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ निवासी संकुलाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्प हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण जीवनमान उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. या वसाहतीचा आराखडा उत्कृष्ट असून बांधकामाची गुणवत्ता सर्वोत्तम असली पाहिजे. तसेच प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने हा संपूर्ण प्रकल्प दीड वर्षाच्या आत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या निवासी संकुलामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक सुविधांनी युक्त, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी निवासी संकुलातील विविध सुविधा आणि प्रकल्पाच्या आराखड्याविषयी माहिती दिली. हा प्रकल्प दीड वर्षाच्या आत पूर्ण करून त्याचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
