भुईबावडा कॉपी प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
तालुक्याची प्रतिमा मलिन; संबंधित शिक्षकांवरील शिस्तभंग कारवाईची माहिती घेण्याचे निर्देश – सभापती सिद्धेश रावराणे
वैभववाडी : प्रतिनिधी
भुईबावडा परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणामुळे वैभववाडी तालुक्याची प्रतिमा मलिन झाली असून या प्रकरणातील सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केली. पंचायत समितीच्या मासिक सभेत हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
पंचायत समिती सभागृहात आयोजित मासिक सभेदरम्यान सभापती रावराणे यांनी गटशिक्षणाधिकारी श्री. थोरात यांच्याकडे या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मागितली. यावर उत्तर देताना श्री. थोरात यांनी माध्यमिक शिक्षण विभागामार्फत चौकशी पूर्ण करण्यात आली असून त्याचा अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आल्याची माहिती दिली.
दरम्यान, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांबाबत विचारणा करण्यात आली असता त्यासंदर्भात आपल्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सभापती रावराणे यांनी माध्यमांमधील वृत्तांनुसार या प्रकरणात २४ जणांना दोषी ठरविण्यात आल्याचे समजत असल्याचे सांगून संबंधित सर्वांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणात संबंधित शिक्षकांवर त्यांच्या संस्थांकडून कोणती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, याचीही माहिती घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
भुईबावडा कॉपी प्रकरणामुळे संपूर्ण वैभववाडी तालुक्याची बदनामी झाली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मतही सभापती सिद्धेश रावराणे यांनी सभेत व्यक्त केले.
