स्वयंपाकगृह भाडेतत्वावर चालविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या माजी सैनिक विश्रामगृह, मालवण येथे येणाऱ्या पर्यटकांना चहापान व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेले स्वतंत्र स्वयंपाकगृह भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे. तरी इच्छुक वीरनारी, युद्धग्रस्त सैनिक, माजी सैनिक पत्नी महिला बचत गट, फिजिकल कॅज्युअल्टी माजी सैनिक विधवा, माजी सैनिक पत्नी (पुनर्नियुक्त नसलेली) तसेच सेवारत सैनिक पत्नी यांनी सैन्यसेवा पुस्तक व ओळखपत्रासह दिनांक 20 जून २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.
सिंधुदुर्ग हा पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा असून मालवण येथे दरवर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. स्वच्छ समुद्रकिनारे तसेच स्कुबा डायव्हिंगसारख्या आकर्षक सुविधांमुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर माजी सैनिक विश्रामगृहात येणाऱ्या पर्यटक व उतारूंसाठी चहा, कॉफी, नाष्टा व अन्य अल्पोपहाराची सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्वयंपाकगृह भाडेतत्त्वावर देताना वीरनारी, युद्धग्रस्त सैनिक, माजी सैनिक पत्नी महिला बचत गट, फिजिकल कॅज्युअल्टी माजी सैनिक विधवा, माजी सैनिक पत्नी (पुनर्नियुक्त नसलेली) तसेच सेवारत सैनिक पत्नी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंपाकगृहाचे मासिक भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार आकारण्यात आहे.अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
