कलाप्रेमी रिक्षाचालक सुरेश अनंत आरोलकर यांचे निधन
सावंतवाडी
कोलगाव, मारुती मंदिर परिसरातील रहिवासी तथा कलाप्रेमी रिक्षाचालक सुरेश अनंत आरोलकर (वय 65) यांचे मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर रात्री उशिरा सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रिक्षा व्यवसायातून उदरनिर्वाह करणारे सुरेश आरोलकर हे कलाक्षेत्राची विशेष आवड जपणारे व्यक्तिमत्त्व होते. विशेषतः सावंतवाडीतील गणेशोत्सवासाठी आकर्षक हलते चित्ररथ तयार करण्याची त्यांना आवड होती. त्यांच्या या कलाकृतींमुळे त्यांची परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली होती.
ते कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठे बंधू श्रीकृष्ण उर्फ बाबी आरोलकर, धाकटे बंधू सुनील आरोलकर, बहीण, पुतणे तसेच अन्य नातेवाईक असा परिवार आहे.
सुरेश आरोलकर यांच्या निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली.
