You are currently viewing नको वाटते

नको वाटते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नको वाटते* (बाल गझल)

 

आई नसता घरी परतणे नको वाटते

फुलोर नसल्या बनात शिरणे नको वाटते

 

साऱ्यांना तर सांगत जातो मोठ्ठा झालो

स्वतः घराचे दार उघडणे नको वाटते

 

‘ लवकर येते ‘ निरोप आहे तिचा मिळाला

उदासवाण्या घरात बसणे नको वाटते

 

शाळेमधल्या गंमत गोष्टीं कुणास सांगू

बाबा,ताई सवे बोलणे नको वाटत

 

खुणावतो मज कपाटातील खेळ अनोखा

संधी असुनी खेळ मांडणे नको वाटते

 

ओट्यावरती वाट पाहतो खमंग खाऊ

आई नसता तसेच चरणे नको वाटते

 

अखेर जेव्हा परते आई दिवे उजळती

आईशी मग कट्टी करणे नको वाटते

 

श्रीनिवास गडकरी

9130861304

रोहा पेण पुणे

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा