You are currently viewing राजघराण्यावर आरोप खपवून घेणार नाही; मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा : श्रद्धाराजे भोसले
Oplus_16908288

राजघराण्यावर आरोप खपवून घेणार नाही; मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा : श्रद्धाराजे भोसले

ग्रो-बीग टेक्नॉलॉजीकडून केवळ १५ दिवसांचे भाडे; दीड महिना जागेचा वापर केल्याचा दावा, डिसोजांच्या आरोपांना नगराध्यक्षांचा जोरदार पलटवार

सावंतवाडी | प्रतिनिधी :

ग्रो-बीग टेक्नॉलॉजी ही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नगरपरिषदेकडून भाडे आकारणी करण्यात आली आहे. संबंधित संस्थेने १५ दिवसांचे भाडे भरले असून तब्बल दीड महिना जागेचा वापर केला आहे. एका रूमची परवानगी घेऊन तीन रूम वापरण्यात आल्याचा मुद्दाही समोर आला आहे. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझ्यावर टीका करण्याऐवजी मायकल डिसोजा यांनी राजघराण्यावर आरोप करणे अयोग्य असून याबाबत मानहानीचा दावा दाखल करण्याचा विचार आहे, असा पलटवार सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी केला.

आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षा म्हणाल्या, माझ्यावर अनेक आरोप झाले तरी प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची आमची भूमिका नाही. काम करत राहणे हाच आमचा उद्देश आहे. ग्रो-बिग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जिमखाना येथे सेंटर सुरू करण्यात आले होते. ते सांस्कृतिक व वस्तुसंग्रहालय असल्याने तेथे काही चांगले उपक्रम होतील या अपेक्षेने आम्ही परवानगी दिली होती. तसेच मुंबई विद्यापीठ आणि ग्रो-बिग टेक्नॉलॉजीकडून होणारे कामकाज पाहण्यासाठी आम्ही तेथे भेट दिली होती.

यावेळी काही बाबी निदर्शनास आल्या. १५ दिवसांसाठी ५० हजार रुपये व जीएसटीसह ९ हजार रुपये दराने जागा देण्यात आली होती. त्याबाबत कौन्सिल बैठकीतही चर्चा होणार होती. मात्र, दीड महिना उलटूनही कंपनी तेथेच कार्यरत राहिली. एका रूमची परवानगी घेऊन तीन रूमचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळाली. बाथरूम वापराचा कोणताही विषय नव्हता. तिसऱ्या रूममध्ये त्यांच्या मुलांचे जेवण सुरू होते. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही.

नगरपरिषदेच्या इमारतीचा वापर नेमका कशासाठी केला जातो, यावर लक्ष ठेवणे ही नगराध्यक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. याबाबत विचारणा केल्यामुळे राजघराण्यावर टीका केली जात आहे. आमच्या कुटुंबीयांवरही आरोप करण्यात येत आहेत. राजकारणात येताना लोकांची कामे करण्यासाठी आणि सावंतवाडीच्या विकासासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच कोणावरही वैयक्तिक टीका करण्याची आमची भूमिका नाही. नगरपरिषदेच्या इमारतीत काही गैरप्रकार होत असतील तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी आहे. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी हाच आमचा उद्देश आहे. दरही काचेचे असून कोणालाही टाळण्याचा हेतू नाही. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.

अनेकांनी आमच्यावर आरोप केले आहेत. मात्र, त्यात तथ्य असल्यास पुरावे पुढे आणावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. संबंधित संस्थेने १५ दिवसांसाठी जागा मागितली होती व त्याचा करारही झाला होता. प्रशासनाकडून ५० हजार रुपये भाडे आणि जीएसटीसह ९ हजार रुपये आकारण्यात आले होते. मात्र, आज दीड महिना उलटून गेला तरी त्याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. त्यांनी एक महिन्याचे भाडे दिलेले नसून केवळ १५ दिवसांचे भाडे भरले आहे. खासगी कंपनी असल्यामुळे भाडे आकारणी करण्यात आली. रोजगारनिर्मितीच्या उद्देशाने त्यांनी मागणी केल्याने प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली होती.

मुंबई विद्यापीठ यापूर्वीही नगराध्यक्ष होण्यापूर्वी येथे आले होते. त्याबाबत वरिष्ठांनी निर्णय घेतले होते. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविणे हेच माझे ध्येय असून यासंदर्भात ठराव करून पुढील भूमिका घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरात विकासकामे करताना काही अडचणी येतात. मात्र, आमची टीम सज्ज असून नागरिकांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे होणारी टीका निराधार आहे. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाबाबतही चर्चा झाली आहे. यासाठी मुंबईत अनेक बैठका झाल्या असून राजघराण्याने विविध ठिकाणी जागाही उपलब्ध करून दिल्या आहेत. माझ्यावर टीका झाली तरी चालेल; मात्र राजघराण्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप करणे योग्य नाही. त्यामुळे मानहानीचा दावा दाखल करण्याचाही विचार असल्याचे मत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा