विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती व वेंगुर्ले सागरी पोलीस ठाण्यांमध्ये आजपासून रुजू; स्थानिक युवकांना संधी
ओरोस : पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि संवेदनशील सागरी क्षेत्रामुळे राज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ६० मरीन होमगार्डची नियुक्ती केली आहे. विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या जवानांना आजपासून जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर रुजू करण्यात आले आहे.
सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर पोलीस दलाला सक्षम सहकार्य मिळावे या उद्देशाने “मरीन होमगार्ड” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती आणि वेंगुर्ले या सहा सागरी पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी दहा अशा एकूण ६० मरीन होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या किनारी भागात वास्तव्यास असलेल्या आणि पोहण्याचे कौशल्य असलेल्या स्थानिक युवकांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. हे जवान बंदरे, जेटी, लँडिंग पॉईंट, सागरी किनारे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व देखरेखीची जबाबदारी सांभाळणार आहेत.
सिंधुदुर्गच्या सागरी सुरक्षेसाठी उचलण्यात आलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, स्थानिक युवकांच्या सहभागामुळे सुरक्षा यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणार आहे.
