नगरसेविका निलम नाईक यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी
सावंतवाडी :
नगरपरिषदेचा कारभार आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेला तातडीने कायमस्वरूपी व कार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका निलम परिमल नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडे इतर ठिकाणचाही अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना सावंतवाडीसारख्या मोठ्या नगरपरिषदेसाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका निलम नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा दाखला दिला आहे. सावंतवाडी नगरपरिषद ही संस्थानकालीन नगरपरिषद असून तिची स्थापना सन १८७७ मध्ये झाली आहे. तब्बल १४९ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेली ही नगरपरिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांत जुनी आणि नावलौकिक प्राप्त नगरपरिषद म्हणून ओळखली जाते.
सध्या सावंतवाडी शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे २३ हजार होती, जी आजमितीस ३५ हजारांहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच नगरपरिषदेचा आर्थिक विस्तारही मोठा असून सन २०२६-२७ या वर्षाचे नगरपरिषदेचे अंदाजित बजेट सुमारे १४९ कोटी रुपये आहे.
एकीकडे शहराचा विस्तार आणि आर्थिक उलाढाल वाढत असताना दुसरीकडे पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेला नाही. मुख्याधिकारी हे नगरपरिषद प्रशासनाचा कणा मानले जातात. शहराचा कारभार आणि प्रशासन सक्षमपणे चालवण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे ही काळाची गरज बनली आहे. कायमस्वरूपी अधिकारी असल्यास सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत व नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आणि शहरात सुशासन निर्माण करणे शक्य होईल.
सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार असून त्यांच्याकडे अन्य ठिकाणच्या जबाबदाऱ्याही आहेत. परिणामी, सावंतवाडीसारख्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नगरपरिषदेला त्यांचा पुरेसा वेळ देता येत नाही. याचा थेट परिणाम शहरातील विकासकामांवर आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर होत आहे.
ही गैरसोय दूर करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेला तातडीने स्वतंत्र आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, अशी आग्रही मागणी सौ. निलम नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
