You are currently viewing सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी शासन सकारात्मक; आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव सादर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी शासन सकारात्मक; आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव सादर

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या चर्चासत्रात पायाभूत सुविधा, परवाने, जलपर्यटन आणि पर्यटनस्थळांच्या ब्रँडिंगवर भर

मालवण / तारकर्ली :

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव पर्यटन विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांना सादर करण्यात आला. यानिमित्त  मिठबावकर यांच्या निवासस्थानी “पर्यटन व्यवसाय : समस्या व दिशा” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यटन महासंघाचे समन्वयक रवींद्र खानविलकर व गुरु राणे यांनी डॉ. प्रज्ञा मनोहर, विभागीय पर्यटन अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून केली. यावेळी पर्यटन क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक व संस्थांच्या प्रतिनिधींनी घनकचरा व्यवस्थापन, पाणी, वीज, पर्यटन व्यवसाय परवाने मिळविताना येणाऱ्या अडचणी आदी विषय मांडले.

राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्थानिक स्तरावर अशा चर्चासत्रांचे आयोजन व्हावे यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाने समन्वयकाची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. पर्यटनासाठी आवश्यक सुविधा व विकासकामांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी सांगितले की, महिला पर्यटन व्यावसायिकांसाठी १५ लाख रुपयांपर्यंतची व्याजमुक्त ‘आई’ कर्ज योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांची बैठक आयोजित केली जाईल. कातळशिल्प संवर्धन व आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जलपर्यटनाचा कालावधी १० जूनपर्यंत वाढविणे, नद्या, तलाव व धरण परिसरात बारमाही जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

जलक्रीडा व्यवसायातील पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, एकसमान दर प्रणाली आणि एकखिडकी योजना लागू करण्यात येणार असून, परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी विशेष शिबिरांचे आयोजन करून परवाने वितरित करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्प, जागतिक वारसा दर्जा मिळालेला विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ला, श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा, आंगणेवाडी, कुणकेश्वर मंदिर, राजकोट किल्ला, वैभववाडीतील बकासुर वाडा, नापणे येथील काचेचे फूल, सावंतवाडी राजवाडा, केएसआर ग्लोबल अ‍ॅक्वेरियम, आंबोलीची जैवविविधता, गंजीफा खेळ, दशावतार कला, विविध खाद्यसंस्कृती आणि अपरिचित समुद्रकिनाऱ्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन प्रकल्पांना सोलर सिस्टीम जोडण्यासाठी अनुदान मिळावे यासाठी महासंघाने प्रस्ताव सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी पर्यटन प्रकल्पांसाठी स्वतंत्र परवान्याची आवश्यकता नसून जास्तीत जास्त व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाकडे ऑनलाइन नोंदणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुरत्न योजनेअंतर्गत होमस्टे व कृषी पर्यटन व्यावसायिकांसाठी नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार असून स्थानिक पर्यटन समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक आयोजित केली जाईल. तसेच प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून रस्ते, वीज, पाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी पर्यटन संचालनालय आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी पर्यटन व्यावसायिकांना अपेक्षित प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले. चर्चासत्र सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नितीन वाळके, टीटीडीएस अध्यक्ष सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, गुरु राणे, सुमेधा नाईक, महेश सामंत, मिथिलेश मिठबावकर, मिलिंद झाड, बाळू पडवळ, देवानंद लोकेगावकर, देवेंद्र शेटकर, रेश्मा सावंत, रामा चोपडेकर, संजय केळुसकर, प्रमोद सावंत, नंदू तारी आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा