सावंतवाडीत भरदिवसा चेन स्नॅचिंग; ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दुचाकीस्वार फरार
कॉसमॉस पॅराडाईज परिसरातील घटना; सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने तपासात अडथळे, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू
सावंतवाडी : प्रतिनिधी
शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि भरवस्तीत असलेल्या कॉसमॉस पॅराडाईज बिल्डिंग परिसरात आज सकाळी धाडसी चेन स्नॅचिंगची घटना घडली. मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीमती रंजना पांडुरंग ठाकूर (वय ५९, रा. कॉसमॉस पॅराडाईज, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीमती ठाकूर या त्यांच्या एका सहकारी महिलेसोबत बिल्डिंगखाली उभ्या होत्या. यावेळी एक अनोळखी तरुण शेअर मार्केटचे काम करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आला. त्याच्या बोलण्यातील संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने ठाकूर यांनी त्याला सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यास सांगितले.
दरम्यान, श्रीमती ठाकूर या पाठमोऱ्या होताच त्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जोरात हिसकावली. बिल्डिंगबाहेर दुचाकी सुरू ठेवून उभ्या असलेल्या साथीदाराकडे धावत जाऊन तो बसला आणि दोघांनी जेलच्या दिशेने पलायन केले.
घटनेनंतर श्रीमती ठाकूर यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ प्रतिसाद देत स्वतःच्या दुचाकींवरून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे वेगाने पसार होण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या पेहरावावरून ते परप्रांतीय असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका नीलम नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. मात्र, संभाजी चौकातील सीसीटीव्ही बंद असून जेल परिसरातील फुटेज अस्पष्ट असल्याचे समोर आले. यावर नाराजी व्यक्त करत नाईक यांनी या संदर्भात पोलिसांना लेखी निवेदन देण्याचा इशारा दिला आहे.
सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. कॉसमॉस पॅराडाईज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित दुचाकीस्वार कैद झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. संशयित दुचाकीस्वार कॅमेऱ्यात दिसत असले तरी त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे सावंतवाडीतील नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.
