एलएलबी परीक्षेत मैथिली बगळेचे प्रथम श्रेणीत यश
समीर नलावडे व अबिद नाईक यांच्या हस्ते सत्कार; शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव
कणकवली
कणकवली शहरातील कनकनगर येथील कु. मैथिली बगळे हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमधून एलएलबी (विधीतज्ञ) पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मैथिलीच्या या यशाबद्दल कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी तिचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
मैथिलीचे दहावीपर्यंतचे शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. कायद्याच्या क्षेत्राची विशेष आवड असल्याने तिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या मेहनतीचे फळ मिळवले.
मैथिलीचे वडील निळकंठ बगळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर तिची आई दारिस्ते जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. मैथिलीच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
