You are currently viewing आडाळी येथे कार-ट्रकची जोरदार धडक; कारचे मोठे नुकसान

आडाळी येथे कार-ट्रकची जोरदार धडक; कारचे मोठे नुकसान

आडाळी येथे कार-ट्रकची जोरदार धडक; कारचे मोठे नुकसान

श्री माऊली मंदिराजवळील तीव्र वळणावर अपघात; सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी बचावले, भरधाव खनिज वाहतूक वाहनांबाबत नागरिकांचा संताप

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे शनिवारी दुपारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.
हा अपघात शनिवारी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग-बांदा राज्य मार्गावरील आडाळी येथील श्री माऊली मंदिराजवळील तीव्र वळणावर घडला. बांदा येथून दोडामार्गकडे येत असलेल्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
स्थानिकांच्या माहितीनुसार, कळणे परिसरातून खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहतूक करणारी वाहने लक्ष्य पूर्ण करण्याच्या घाईत भरधाव वेगाने धावत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही अनेकदा करण्यात आल्या आहेत. मात्र संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने अशा अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला जाब विचारत भरधाव वाहन चालविण्याबाबत नाराजी व्यक्त केली. खनिजयुक्त मातीची वाहतूक करताना नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे दोडामार्ग-बांदा मार्गावरील भरधाव खनिज वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा