You are currently viewing रसग्रहण ( भावगीत )
Oplus_16908288

रसग्रहण ( भावगीत )

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री राधा गर्दे यांच्या भावगीताचे ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांनी केलेलं रसग्रहण*

 

*रसग्रहण ( भावगीत )*

 

कळी फूल होताच धुंदावली

वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

 

सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥१॥

 

अली चुंबिता रोखुनी पाहते

तरी मुग्ध होऊनिया लाजते

मनाने अलिशी असे बांधली

वसंतासवे गर्विता जाहली ॥२॥

 

मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

खुले रूप लावण्य हे राजसी

जणू मेनकारूप ही ल्यायली

वसंतासवे गर्विता जाहली॥३॥

 

पहाटेस निहार सुस्तावता

चकाकून देहावरी थांबता

शहारुन ती बावरू लागली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥४॥

 

कवयित्री सौ. राधा गर्दे यांचे हे भावगीत वाचले आणि ताबडतोब त्यांच्या परवानगीने मी रसग्रहण लिहायला बसले.

सौ. राधा गर्दे या संस्कृत पंडिता आहेत. त्यांच्या काव्यातून अनेकदा संस्कृत शब्दांचा मुक्त संचार आढळतो. खरं सांगायचं तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, आणि जेव्हा आपण भारदस्त भाषा वापरतो तेव्हा या संस्कृत शब्दांच्या पखरणीमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. राधाताईंच्या या कवितेतून नेमके हेच चित्र दृश्यरूप झाल्याचे आढळते.

 

कळी फुल होताच धुंदावली

वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

 

ध्रुवपदाच्या या दोन ओळी वाचता क्षणीच आपल्या नजरेसमोर चित्र येते ते वसंत ऋतुतल्या बहराचे. जिकडे तिकडे जाई, जुई, मोगरा ,चमेली, सोनचाफा ही सुगंधित फुले फुललेली असतात आणि वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता दिसून येते. या फुलातील एका कळीला तिच्या सौंदर्याचा गर्व होतो अशी कवयित्रीची कल्पना आहे.

 

सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे…………

 

हे कळीचे नुकतेच उमलून आलेले फुल त्याच्यावरील दवबिंदूंच्या वर्षावाने जणू काही न्हाऊन निघाले आहे आणि मोठ्या रुबाबात ते त्याचा परिमळ सर्वत्र पसरवत आहे.

 

अली चुंबिता रोखुनी पाहते

तरी मुग्ध होऊनिया लाजते

मनाने अलीशी असे बांधली

वसंतासवे………..

 

या दुसऱ्या अंतर्‍यात त्या फुलावर लुब्ध होऊन

अली म्हणजे भ्रमर त्याचे चुंबन घेत आहे आणि ते फुल अतिशय मुग्ध व लज्जीत झाले आहे. त्या फुलाच्या मनात या मधुपा विषयी गोड प्रेम भाव निर्माण झाला आहे.

 

मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

खुले रूप लावण्य हे राजसी

जणू मेनका रूप ही ल्यायली

वसंतासवे…………

 

राधाताई या तिसऱ्या कडव्यात काय सांगत आहेत? तर लाजेने ते फुल आपल्या पाकळ्या अलगदपणे मिटून घेत आहे आणि त्यामुळे त्याचे राजस रूप अधिकच खुलले आहे.

 

पहाटेस निहार सुस्तावता

चकाकून देहावरी थांबता

शहारुन ती बावरू लागली

वसंतासवे, गर्विता जाहली.

 

या शेवटच्या अंतऱ्यात त्या फुलाची अवस्था राधाताईंनी फार सुंदर शब्दात वर्णन केली आहे. पहाटेच्या वेळी जशी काही दाट धु क्याची शाल फुलाच्या सर्वांगावर घातली आहे, पहाटेच्या गारव्यामुळे ते फुल जसे काही शहारून गेले आहे.

हा झाला या कवितेचा शब्दशः अर्थ. पण जसजशी ही कविता वाचत जावी तसतसे लक्षात येते की हे एका कळीचे फुलात झालेल्या रूपांतराचे नुसते प्रासादिक वर्णन नसून ही संपूर्ण कविता म्हणजे एक रूपक आहे.

एका मुग्ध बालिकेने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. वसंत ऋतु म्हणजे त्या वयात आलेल्या मुलीच्या मनातील मधुर सुगंधित असे भाव आहेत. तिच्या सौंदर्याचा तिला थोडा गर्व झाला आहे, त्याची ऐट दाखवत ती रुबाबात वावरते आहे.तिचे चुंबन घेणारा भ्रमर हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सखा आहे. त्याच्यासोबत ती मनाने जोडली गेली आहे. त्याच्या स्पर्शाने तिचे रोमरोम शहाले आहे आणि स्त्री सुलभलज्जेने तिचे सौंदर्य इतके खुलले आहे की जणू काही स्वर्गातली अप्सरा मेनकाच पृथ्वीतलावर अवतरली आहे. पहाटेचे धुके म्हणजे प्रियकराच्या सहवासातील प्रेम आहे. त्या प्रेमाच्या धुंदीत तिचे मन बावरून गेले आहे.

चेतनगुणोक्ती अलंकाराने सजलेली राधाताईंची ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेणारे एक सुंदर भावगीत आहे.

भुजंगीवृत्तात ही कविता राधाताईंनी अगदी सहज लिहिल्यासारखी वाटते. अली, निहार, राजसी इत्यादी शब्द कवितेत कसे अगदी चपखल बसले आहेत. रूपसी ~राजसी, सुस्तावता~ थांबता वगैरे स्वरयमकेही सहज वाटतात. कुठेही कसलीही ओढाताण नाही. वृत्तबद्ध कविता लिहिणे ही गोष्ट तशी सहज करता येण्यासारखी नाही, कारण कवीला सुचलेला शब्द वृत्ताच्या लगावलीत किंवा मात्रेत बसतोच असे नाही. अशावेळी कवीच्या प्रतिभेचा कस लागतो. राधाताई शब्दांच्या या झटापटीतून अगदी अलगद बाहेर पडल्याचे दिसून येते.

अशाच लिहित्या रहा. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा