जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोडामार्ग जी.प. शाळा क्रमांक १ येथे वृक्षारोपण
पंचायत समितीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांची उपस्थिती
दोडामार्ग
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दोडामार्ग येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे पंचायत समिती दोडामार्गच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारची रोपे लावून हरित उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती पावर्ती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर, गटविकास अधिकारी यशवंत गवस तसेच पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि हरित वातावरणाचा संदेश समाजात पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षारोपणानंतर लावलेल्या रोपांची नियमित देखभाल करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
