You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह फ्रीजरची तात्काळ दुरुस्ती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह फ्रीजरची तात्काळ दुरुस्ती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह फ्रीजरची तात्काळ दुरुस्ती

बंद पडलेल्या यंत्रणेची कंपनीकडून दुरुस्ती; मृतदेह ठेवण्याची सुविधा पुन्हा सुरू

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील फ्रीजर बुधवारी रात्री अचानक बंद पडल्याने निधन झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने तात्काळ देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला.
गुरुवारी सकाळीच उपजिल्हा रुग्णालयाकडून संबंधित कंपनीला अधिकृत पत्र पाठविण्यात आले तसेच दूरध्वनीद्वारेही फ्रीजर बंद पडल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या तंत्रज्ञांनी रुग्णालयात भेट देऊन यंत्रणेची तपासणी केली आणि आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतले.
शुक्रवारी फ्रीजरची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून शवगृहाची सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे निधन झालेल्या व्यक्तींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याची सुविधा पूर्ववत उपलब्ध झाली असून रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती देताना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सांगितले की, शवगृहातील फ्रीजर बंद पडल्याची माहिती मिळताच संबंधित कंपनीशी तातडीने संपर्क साधण्यात आला. कंपनीच्या तंत्रज्ञांनी तत्परतेने दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याने शवगृहाची सुविधा पुन्हा सुरू झाली असून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा