पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे ओरोसमध्ये आंदोलन
आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग
पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि इंधनटंचाईच्या विरोधात प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरवाढ तात्काळ मागे घेण्याबरोबरच जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास संपूर्ण जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
महागाईच्या जखमेवर मीठ चोळणारी दरवाढ
निवेदनात म्हटले आहे की, मागील ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर ८ रुपयांची वाढ करण्यात आली असून, ही वाढ आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेसाठी मोठा आर्थिक भार ठरत आहे. गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या दरात ३८ टक्के तर डिझेलच्या दरात ६२ टक्के वाढ झाली असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
जनतेच्या खिशावर दरोडा : काँग्रेसचा आरोप
केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर व उत्पादन शुल्काच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांत ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच अलीकडील दरवाढीनंतर भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी काही तासांतच १२,४०० कोटी रुपयांची कमाई केल्याचा उल्लेख करून ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
इंधनटंचाईचा शेतीवरही परिणाम
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबरच राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेल्या डिझेलअभावी शेतीची कामे रखडत असून, याचा अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सरकारने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करून दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबूलकर, अजिंक्य गावडे, प्रकाश जैतापकर, मेघनाद धुरी, रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, बाळू मेस्त्री, प्रवीण वरुणकर, विद्या प्रसाद बांदेकर, महेश तेली, शांताराम नेवरेकर, विधाता सावंत, जेम्स फर्नांडीस, प्रदीप मांजरेकर, उमेश कुलकर्णी, अभय मालवणकर, मंदार शिरसाट, संजय लाड, सुरज घाडी, प्रवीण आचरेकर, तबरेज शेख, चंदन पांगे, उल्हास शिरसाठ, यश तेली, प्रमोद घाडीगावकर, केतन गावडे, उमेश मोंडकर, आनंद परुळेकर, अतिश उर्फ भाई जेठे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
