You are currently viewing आंबोलीत दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा उत्साहात संपन्न
Oplus_16908288

आंबोलीत दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा उत्साहात संपन्न

साईकृपा संस्था, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; ४० हून अधिक दिव्यांग बांधवांचा सहभाग

 

आंबोली / प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि आंबोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २५ मे) आंबोली विभागातील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला. सकाळी १० वाजता झालेला हा मेळावा आंबोली गावात प्रथमच आयोजित करण्यात आला असून तो अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जागतिक कीर्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला.

या मेळाव्याला आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक नाटलेकर, ग्रामपंचायत अधिकारी एस. जी. गोसावी, राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघाचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सौ. सविता गावडे, विनायक देसाई, साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, संस्थेच्या कर्मचारी विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे आणि पवित्रा शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. दिव्यांगांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठीच हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगत, शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनीही दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना त्यांच्या समस्या व अडचणी मांडण्यासाठी कोणताही संकोच बाळगू नये, असे सांगितले. ग्रामपंचायत स्तरावर त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, तसेच इतर तांत्रिक अडचणींचे निराकरण अनिल शिंगाडे यांच्या माध्यमातून करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या मेळाव्यात ४० हून अधिक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. यावेळी साईकृपा संस्थेच्या वतीने नेहा पटकारे आणि सिद्धी पडवळ यांना श्रवणयंत्र (कानफॉर्म मशीन) प्रदान करण्यात आले. तसेच बाळकृष्ण गावडे यांना वॉकिंग स्टिक (चालण्याची काठी) देण्यात आली. याशिवाय उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना संस्थेच्या वतीने उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या कर्मचारी श्रीमती शिर्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी विशेष आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा