केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन; विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न
वैभववाडी :
लोरे येथे भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना राणे यांनी पक्षाचे कार्यालय हे केवळ राजकीय कार्याचे ठिकाण नसून जनतेसाठी सेवा केंद्र असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास वैभववाडी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, जिल्हा परिषद सदस्या रिद्धी सुतार, उपसभापती साची कोलते, देवानंद पालांडे, महेश संसारे, प्राची तावडे, मंगेश लोके, रितेश सुतार, विलास नांवळे, प्रकाश गव्हाणकर, उद्योजक अनंत मांजळकर, संजय सावंत, माजी सरपंच महेंद्र रावराणे, अमरसिंह रावराणे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, कार्यालयातील नेत्यांचे फोटो हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान असतात. कार्यालयात नियोजन, शिस्त आणि सातत्यपूर्ण लोकसंपर्क याला महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यालयात नियमित येऊन जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यालयाचा वर्धापन दिन नियमितपणे साजरा व्हावा. त्या दिवशी कार्यालयाच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या नागरिकांचा आढावा घेऊन सेवा कार्याचे मूल्यमापन करावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यालय सुरू करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात अशा प्रकारचे कार्यालय सुरू झाले पाहिजे. या कार्यालयांमुळे जनतेला आवश्यक सोयी-सुविधा सहज उपलब्ध होतील, असे आवाहनही राणे यांनी केले.
यावेळी लोरे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक अनंत मांजळकर यांचाही नितेश राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रितेश सुतार यांनी केले.
