You are currently viewing कणकवली तालुक्यात ४ जूनला विशेष स्वच्छता मोहीम

कणकवली तालुक्यात ४ जूनला विशेष स्वच्छता मोहीम

कणकवली तालुक्यात ४ जूनला विशेष स्वच्छता मोहीम

‘संडे ऑन सायकल’ उपक्रमातून आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कणकवली :

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच स्वच्छतेची लोकचळवळ उभारण्यासाठी ४ जून २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी श्री. अरूण चव्हाण यांनी केले आहे.

ही मोहीम तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ४ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालये, मंदिरे, बाजारपेठा, सार्वजनिक रस्ते तसेच कचरा साचलेल्या इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

तसेच फिट इंडिया मिशन अंतर्गत ७ जून २०२६ रोजी “संडे ऑन सायकल” या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून अधिक तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी दिली.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविणे हा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सायकल वापराचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत, बचत गट सदस्य, विद्यार्थी तसेच नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर “संडे ऑन सायकल” उपक्रमाचे नियोजन करण्यात येणार असून सायकल रॅली, जनजागृती फेरी, स्वच्छता संदेश प्रसार आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी फिट इंडिया मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा