You are currently viewing इंधन दरवाढ व टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक; उद्या ओरोस येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इंधन दरवाढ व टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक; उद्या ओरोस येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इंधन दरवाढ व टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक; उद्या ओरोस येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हा काँग्रेसची महत्त्वाची बैठकही होणार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

मालवण

देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या इंधन दरवाढ आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या, २९ मे रोजी सकाळी ११.३० वाजता ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी या आंदोलनाची अधिकृत घोषणा केली आहे.

सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या इंधन दरवाढीच्या तसेच इंधन टंचाईच्या गंभीर समस्यांकडे प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या आंदोलनानंतर दुपारी १२.३० वाजता ओरोस येथील पत्रकार भवन येथे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत आगामी राजकीय रणनीती तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमांना जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार, प्रदेश पदाधिकारी व प्रांतिक सदस्य, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग, एनएसयुआय तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व तालुका पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.

तसेच सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी आणि सक्रीय कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ओरोस येथे वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा