महिलावर होणारा अत्याचार ही आजच्या काळात अतिशय ज्वलंत समस्या आहे हे सत्य कुणी नाकारणार नाही.
रोज वर्तमानपत्र उघडले की महिलेवरील अत्याचाराची एक तरी बातमी असतेच असते. टीव्ही सुरू केला तरी तीच बातमी — पुन्हा पुन्हा सांगत असतात.’ काय कारण असेल ह्याचे? इकडे विज्ञानाने इतकी प्रगती केली आणि दुसरीकडे इतकी अधोगती? आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी स्वरूप मानले जाते. स्त्री ही क्षणभराची पत्नी व अनंतकाळाची माता म्हटले जाते.मग स्त्रीवर अत्याचार करतांना कुठे असते ही भावना? का वाढले आहे हे अत्याचाराचे प्रमाण? अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे : सोशल मीडिया देखील ह्यासाठी जवाबदार आहेच! Tv वर येणाऱ्या जाहिराती पाहिल्या तर पुरुषांनी वापरायच्या वस्तूंची जाहिरात एखादी तरुणी करत असते.अनेक जाहिराती अशा असतात की ज्या घरातील सर्व मंडळी बरोबर पाहतांना लाज वाटते.
हे का ? स्त्रीला अशा स्वरूपात दाखविताना कुणीच का विरोध करीत नाहीत.का आक्षेप घेतला जात नाही? का आजच्या तरुणी अशा प्रकारच्या जाहिरातीत स्वतःचे अंगप्रदर्शन करतात? का? कारण स्वातंत्र्याची चुकीची कल्पना आणि आजची वाढलेली सुखलोलुपता! स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे हा आजच्या काळातील स्वातंत्र्याचा नवा अर्थ!सर्व प्रकारची सुखे मिळविण्याची आजची प्रवृत्तीच ह्याला कारणीभूत आहे. एखादी वस्तू ,सुविधा पाहिजे म्हणजे पाहीजेच! त्यासाठी काहीही करण्याइतका बेतालपणा अमर्याद वाढलेला आहे परंतु असे करणे कितपत बरोबर? हा विचारच नाही! आम्हाला वाटते तसे आम्ही वागू ही आजची सगळ्यांचीच वृत्ती! ह्यालाही कारण घरातले संस्कार ! घरातच मनाला नीट वळण लागत नाही असे खेदाने म्हणावे लागते मुलांचे फाजील लाड, त्याच्या पुढे पुढे करणे, तो म्हणेल तसे करू देणे हे प्रमाण घरोघरी वाढलेले आहे एकुलते एक मूल, त्याच्या इच्छेने सगळे करणार! कुठे तरी थांबायला हवं हे त्याला कोण शिकविणार? त्याची तर काही शाळा नसते ते घरातच शिकविले गेले पाहिजे. आईवडील दोघेही नोकरी करणारे त्यांचे व्याप, छंद यात मुलाच्या मानसिकतेकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे? त्याचे खाणे पिणे, हवे नको सगळेच पैशाने थोडी पूर्ण होणार?त्याला हवे असते प्रेम! आपल्याकडे आईबाबांचे लक्ष आहे ही भावना मुलाचे चरित्र बनवायला पुरेशी असते. नेमके हेच होत नाही ही वस्तुस्थिति असते! पैसा असला की सर्व सुखे मिळतात अस वाटू लागलं की तो मिळविण्याचे भले बुरे मार्ग शोधले जातात व त्या प्रवाहात शिरलेली व्यक्ती हळूहळू काहीही करू लागते! तरुणीच्या ह्या जाहिराती पाहून त्यांना त्या सहज मिळत असतील अस नाही वाटत अजिबात! पण लक्ष कोण देणार? ह्या जाहिराती पाहून मनाला खूप दुःख होते
स्त्री अत्याचाराचे प्रमाण वाढण्यासाठी स्वतः स्त्री सुद्धा मोठया प्रमाणात कारणीभूत आहे असं मी एक स्त्री असून म्हणेन! आजच्या मुलींचे कपडे, राहणी , केशभूषा व त्यांचे वागणे पहा, पूर्वीच्या आणि आजच्या स्त्रीच्या वेशभूषेत विचारात आमूलाग्र फरक आहे. तुम्ही वाटेल तसे कपडे घालाल हॉटेलमध्ये जाल तर का नाही एखादा मुलगा तुमची छेडखानी करणार? तरुण नाही तर काही म्हातारे अर्क सुद्धा या बाबतीत अग्रेसर असतात! आजकाल येणाऱ्या बातम्या पहा ना? म्हाताऱ्यांचीही डोकी बिघडली आहेत आजच्या युगात! स्त्रीवर, नव्हे लहान मुलीवर अत्याचार करणारा तिचाच बाप असतो कधी आजोबा, काका असतो शब्द कमी पडतील निषेध करायला आणि अशा लोकांबद्दल बोलायला? बाप हाच लेकीचा खरा मित्र असे म्हणत होतो आम्ही! मुली पार्ट्या करतात बारमध्ये जातात. ह्यात कुठे आहे शालिनता ? रात्रभर बाहेर असतात .ह्याला म्हणायचे का संस्कृती ? निसर्ग: ताच स्त्री पुरुष हा भेद आहे.
स्त्रीचा मौल्यवान दागिना म्हणजे तिची अब्रू !पुरुष मोकळा असतो पण स्त्रीवर अनेक बंधने असतात ती स्त्रीने स्वीकारलीच पाहिजेत.
तिला शिक्षणाचा अधिकार स्वकर्तुत्व दाखविण्याचा अधिकार जरूर आहे पण समाजात मन मानेल. तस वागून नाही चालणार तिला ! लक्ष्मण रेषेचे भान ठेवलेच पाहिजे तिने , कुटूंबसंस्था ही आपली संस्कृती सगळ्यांच्या
आधाराचे स्थान म्हणजे आपले कुटूंब आपले घर! आधुनिकता, व्यक्तिस्वातंत्र्य या नावावर कुटूंबसंस्था विस्कळीत होत आहे हेसुद्धा एक महत्वाचे कारण आहे स्त्रीवरील अत्याचाराचे!
आज ह्या समस्येकडे खूप गांभीर्याने पाहिले पाहिजे
स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे,
ह्यासाठी स्त्रीनेच मनाशी विचार करून समाजात आपला आदर कसा वाढेल ह्याचा विचार व तसे वर्तन केले पाहिजे कायदा काढून काही फायदा होत नाही.
स्त्रीची इच्छा, वर्तन असे असावे की तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाला हिंमत न व्हावी .
आणखीही बरीच करणे आहेत महिलांवरील अत्याचाराची — शोधा –
उत्तरे नक्की सहज सापडतील..
✒️प्रतिभा पिटके
अमरावती
9421828413
