मंत्रालयात विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
पर्यटन आणि संवर्धनाला चालना देणारा आराखडा सादर; ऐतिहासिक वारसा जपत परिसराचा विकास
फूड पार्क, नौकाविहार, ॲम्फीथिएटरसह आधुनिक सुविधा उभारणार
सावंतवाडी / प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवनासह आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा विकास आराखडा साकारण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक झाली.
मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवत पर्यटन, सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून या परिसराला आकर्षणाचे केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, वास्तुविशारद स्वरदा पोयेरेकर, श्री. अजय नायक आणि श्रद्धा कदम हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी मोती तलाव पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी उपस्थित आमदार दीपकभाई केसरकर तसेच सावंतवाडी राजघराण्यातील सदस्य युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचे विशेष स्वागत केले. जनतेच्या कल्याणासाठी शासन आणि राजघराण्याने एकत्र येऊन केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आजच्या आधुनिक काळात ‘हेरिटेज’ अर्थात वारसा पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक शहरांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ‘थर्टी स्क्वेअर’ आणि ‘आरजेबी-सीपीएल’ (रतन जे. बटलीबॉय कन्सल्टंट्स प्रा. लि.) यांनी त्यांचे पर्यावरण भागीदार ‘एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट’ यांच्या सहकार्याने सर्वसमावेशक विकास आराखडा सादर केला. हा प्रकल्प ‘लोकांसाठी, जागेसाठी आणि पाण्यासाठी’ या तीन मुख्य तत्त्वांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सावंतवाडीची सांस्कृतिक आणि सौंदर्यवैभवपूर्ण ओळख जपत आधुनिक विकास घडवून आणणे हा आहे. मोती तलाव हा पूर्वी शहरातून वाहणाऱ्या पाण्याचा मुख्य नैसर्गिक साठा होता. त्यामुळे तलावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन, पाणी स्वच्छता, जलसंवर्धन आणि संरक्षक भिंतींचे मजबुतीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे.
स्थानिक संस्कृतीचा सन्मान राखत जागतिक पर्यटनाला शाश्वत पद्धतीने आकर्षित करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी स्थानिक पर्यावरण, संस्कृती आणि आर्थिक उपजीविकेला चालना देणाऱ्या विविध सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने फूड पार्क, नौकाविहार सुविधा, उत्सव प्लाझा, पारंपरिक घाट, दशावतार नाटक आणि स्थानिक कलाकारांसाठी खुले नाट्यगृह (अॅम्फीथिएटर) उभारण्यात येणार आहे. संपूर्ण तलाव परिसर पारंपरिक घाटांच्या संकल्पनेवर आधारित शांत, निसर्गरम्य आणि पर्यटनपूरक स्वरूपात विकसित करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
एकंदरीत, मोती तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प हा सावंतवाडीच्या प्रगतिशील भविष्यास दिशा देणारा ठरणार असून ऐतिहासिक वारसा, आधुनिक विकास, स्थानिक समुदाय, पर्यटन, पर्यावरणीय जबाबदारी आणि आर्थिक संधी यांचा सुंदर समतोल साधणारा प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
