*आमदार निलेश राणे यांचे पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप म्हणजे पालकमंत्री नितेश राणे निष्क्रिय असल्याची पोचपावतीच.*
*पोलीस अधीक्षक दहीकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू झाल्यापासूनच आज तगायत कधी आपल्या कार्यालयाच्या बाहेर पडल्याचे पाहण्यात नाही.*
*सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदार व पालकमंत्री यांना गेली दोन अडीज वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने कधी घेतलेलेच नाही- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आरोप.*
नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून केवळ घोषणा आणि बंद पडणाऱ्या योजना याशिवाय प्रत्यक्षात काही ठोस विकासात्मक निर्णय अथवा काम झाल्याचे दिसत नाही. काहीच महिन्यापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस प्रशासनाला जिल्ह्यातील अवैद्य धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते परंतु त्या आदेशाला पोलीस प्रशासनाने केराची टोपली दाखवल्यावर नितेश राणे यांनी स्वतः कणकवली येथे मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांना कारवाई करण्यास भागही पाडले होते. परंतु त्यानंतर आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे सोडा जिल्ह्यात अवैद्य धंदे अधिकच जोमाने सुरू झालेले आहेत. आणि याचाच प्रत्यय म्हणून जिल्ह्यातील आमदार खासदार व पालकमंत्री यांना प्रशासन गांभीर्याने देखील घेत नाहीत. जिल्हा पोलीस अधीक्षक दहीकर यांच्यावर आमदार निलेश राणे यांच्याकडून अवैध धंद्यांचे आरोप म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रशासनावर पकड नसल्याचे स्पष्टच झाले आहे. निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे मनसे कडून समर्थनच आहे परंतु नुसते आरोप नको तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून यावर ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे.
